
स्थैर्य, सातारा, दि. १३ : भारताची गुप्तहेर विभाग रॉ चा एजंट असल्याची बतावणी करून व पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशात फिरून तोतयेगिरी करणार्या युवकाला सातारा तालुका डी.बी. पथकाची कारवाईने जेरबंद केले. नयन राजेंद्र घोरपडे वय 23 मूळ रा. गवडी, ता. सातारा सध्या रा. शनिवारपेठ सातारा असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 11 रोजी महाशिवरात्री निमित्त् कास रोड येथे सातारा तालुका डी.बी. पथकातील पो.ना. सुजीत भोसले व पो.कॉ. नितीराज थोरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मोटारसायकलवरून दोन युवक गेलेले दिसले. त्यापैकी मोटारसायकलस्वाराने उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यासारखा गणवेश परिधान केलेला दिसला. या युवकाच्या हालचाली संशयास्पद जाणवल्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यास थांबवले. युवकाकडे कोणत्या विभागाचे अधिकारी आहात याबाबत विचारपूस केली असता त्याने रॉ विभागाचा एजंट असल्याचे सांगितले. त्याच्याकडे पोलीस दलाबाबतची माहिती घेत असताना त्यास सविस्तर माहिती देता येत नव्हती. त्यामुळे अधिक संशय बळावल्याने त्यास चौकशीकामी पोलीस ठाणयात आणले.
दरम्यान, या घटनेची माहिती वरीष्ठ अधिकारी यांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी डी.बी. पथकास मागदर्शन करून युवकाची अधिक चौकशी केली. यावेळी संंबंधित युवकाने रॉ विभागाशी कोणताही संबंध नसताना त्याविभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करून व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी यांचा हुबेहुब खाकी गणवेश परिधान केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्याच्याविरोधात पो.ना. सुजीत भोसले यांनी सरकार तर्फे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पो.ना. महेंद्र पाटोळे हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनखाली पो.नि. सजन हंकारे, पो. उपनिरीक्षक अमित पाटील व सातारा डी.बी. पथकातील पो.ना. सुजीत भोसले , पो.कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतीश पवार, पो. कॉ. नितीराज थोरात, पो. ना. महेंद्र पाटोळे, पो. ना. हेमंत शिंदे यांनी केली. संबंधित युवकाची तोतयेगिरी गुन्हा उघड केल्याबद्दल पोनि सजन हंकारे व डी.बी. पथकाचे वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
संशयित बोलण्यात पटाईत
संशयित युवक हा बोलण्यामध्ये अत्यंत हजरजबाबी व चाणाक्ष असल्याने त्याने सातारा परिसरात तसेच त्याचे गावी रॉ विभागात नोकरीस असल्याचे बतावणी केल्याचे समजून आले आहे. सदर युवकाकडून रॉ अगर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी सातारा तालुका पोलीस ठाणेशी संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन केले आहे.