पुळकोटीतील वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे आक्रमक; संबंधितांना न्यायालयात खेचणार, कडक कायद्याची मागणी


 माण तालुक्यातील पुळकोटी येथे पाणंद रस्त्यासाठी झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वृक्षतोडीविरोधात कडक कायदा करण्याची मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ५ एप्रिल : माण तालुक्यातील पुळकोटी येथे पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेली वृक्षतोड बेकायदेशीर असून, याप्रकरणी संबंधितांना न्यायालयात खेचणार असल्याचा थेट इशारा सुप्रसिद्ध अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी दिला आहे. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर वचक बसावा आणि त्यांना जरब बसावी, यासाठी राज्यात कडक कायदा करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

‘दुष्काळी भागात जुनी झाडे तोडणे संतापजनक’

सयाजी शिंदे म्हणाले, “माण तालुका हा आधीच दुष्काळी भाग आहे. या तालुक्यातील पुळकोटी येथे अनेक वर्षांपासूनची जुनी झाडे विनाकारण तोडण्यात आली आहेत. रस्त्याचा ठेकेदार आणि सरपंच यांच्या संगनमताने हा दुर्दैवी प्रकार घडला असून, निसर्गाची हानी करणाऱ्या या संबंधितांना आता न्यायालयात याचे उत्तर द्यावेच लागेल.”

आमदार जयकुमार गोरेंनी १ हजार झाडे लावावीत

या घटनेवर बोलताना शिंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचेही लक्ष वेधले. “आमदार जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी आणि आपल्या मतदारसंघात किमान एक हजार झाडे लावावीत,” अशी आग्रही मागणी सयाजी शिंदे यांनी केली.

मुलांप्रमाणे वाढवलेल्या झाडांवर कुऱ्हाड

या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सुनंदा पिंजारी यांनी आपल्या अश्रूभरल्या नयनांनी भावना व्यक्त केल्या.

“गेल्या ३० वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांवर अशा प्रकारे अनधिकृतपणे कुऱ्हाड चालवली गेली, हे अतिशय वेदनादायी आहे. या झाडांमध्ये चिंच, कडुलिंब, पिंपरण, चंदन आदी वृक्षांचा समावेश होता. मी या झाडांना माझ्या पोटच्या मुलांप्रमाणे वाढवले होते.” तसेच, स्थानिक नागरिक विजय बनगर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, “ही वृक्षतोड पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने आम्ही न्याय मिळेल अशी अपेक्षा केली होती. मात्र, न्याय मिळण्याऐवजी उलट आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न झाला.”


Back to top button
Don`t copy text!