
स्थैर्य, बारामती, दि. 12 ऑगस्ट : बारामती तालुक्यातील सावळ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. तृप्ती जितेंद्र वीरकर यांना पुणे येथे ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्टच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १६ सरपंचांना आणि सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय वस्तु एवं सेवाकर लेखा परिक्षाचे आयुक्त देवेंद्र नागवेंकर, अप्पर आयुक्त वैशाली पतंगे, ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. इंद्रजित डोंगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून आणि रस्ता, पाणी, शिक्षण व आरोग्य यांसारख्या सुविधा देऊन सावळ ग्रामपंचायतला विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सौ. तृप्ती वीरकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.