दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । अमरावती । प्रख्यात कवी आणि गज़लकार नितीन भट यांच्या ‘उन्हात घर माझे’ या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाच्या वतीने उत्कृष्ट कवितासंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. निवड समितीने ४५५ पुस्तकांमधून नितीन भट यांच्या काव्यसंग्रहांची निवड केल्याचे संयोजकांनी पत्राद्वारे कळविले आहे. रविवार २७ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथे त्यांना हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे. नितीन भट यांच्या ‘उन्हात घर माझे’ला मिळालेला हा सलग पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार असून यापूर्वी नागपूर येथील साहित्यविहार संस्थेचा संकीर्ण लेखन पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा विशेष शताब्दी पुरस्कार, औदुंबर (जि. सांगली) येथील सदानंद साहित्य मंडळाचा कै. सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार आणि नाशिकच्या साहित्यकणा फाउंडेशनचा सुमनताई पंचभाई स्मृती पुरस्कार असे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.