
फलटण नगरपरिषदेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ जानेवारी : देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज फलटण नगरपरिषदेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांविरुद्ध लढा देऊन मुलींसाठी शिक्षणाची कवाडे उघड्या करणाऱ्या सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. नगरपरिषदेच्या मुख्य सभागृहात आयोजित या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभिवादन सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते देवीदास पाटील, संजय गायकवाड आणि माजी नगरसेवक अजित गायकवाड यांची उपस्थिती होती. तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाचे आणि सामाजिक कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.
