सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही मुक्‍कामी ठेवू नका


स्थैर्य, पुणे, दि. 01 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रहिवाशांकडे त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी अथवा मुक्‍कामी राहण्यासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ आवारात वास्तव्यास असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बोलवू नये आणि पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही मुक्‍कामी ठेवू नये, अशा सक्‍त सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.

विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व आवारात वास्तव्यास असणारे रहिवांशी यांनी वेळोवेळी प्रशासनास सहकार्य केले आहे. याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत विद्यापीठ परिसर हा करोनामुक्‍त राहिला आहे.

अशा प्रकारच्या सामूहिक प्रयत्नांची आगामी काळात देखील आवश्‍यकता आहे, असे सांगत कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठातील रहिवाशांकडे पाहुणे हे कोणत्या भागातून येतात व त्यांची आरोग्य विषयक स्थिती काय आहे याची त्वरित पडताळणी करणे सुरक्षा विभागास शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत नकळतपणे विद्यापीठ रहिवाशांचे आरोग्य व सुरक्षा धोक्‍यात येऊ शकते.

आगामी काळात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कुणालाही विद्यापीठात बोलावू नका. ज्या कुटुंबांमध्ये किंवा त्यांच्या शेजारी ज्येष्ठ नागरिक अथवा लहान मुले आहेत त्यांनी विशेषत: दक्षता घेणे आवश्‍यक आहे. अत्यावश्‍यक कामासाठी पाहुणे विद्यापीठ आवारात आलेच तर त्यांना प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल, असेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!