वन्यजीव वाचवणे सामूहिक जबाबदारी – राहुल निकम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
निसर्ग हा आपला गुरू असून त्यावर आपले भवितव्य अवलंबून आहे, त्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होऊन वन्यजीवन धोक्यात आले आहे. ते वाचवणे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी निसर्ग शिक्षण लोकचळवळ उभी करून निसर्गाचे संगोपन करूया व तापमान वाढ रोखूया, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे पर्यावरण रक्षण कार्यक्रमात वन अधिकारी राहुल निकम यांनी व्यक्त केले.

यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे होते. तसेच विद्या जमदाडे, पौर्णिमा जगताप, गौरी जगदाळे, अंकुश सोळंकी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल निकम पुढे म्हणाले की, निसर्गातील प्रत्येक घटक महत्वाचा आहे. त्याचे रक्षण केले पाहिजे. पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान प्राणी मानव आहे. त्याने मनात आणले तर पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल व प्रत्येक घटकाचे जगणे आनंदी होईल. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धन याविषयी बहारदार कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी ताराचंद्र आवळे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन करणे ही कोणा एकाची जबाबदारी नसून ती पृथ्वीवरील प्रत्येक मानवाची आहे. त्यामुळे आपण आपल्यापासून सुरुवात केली तर आपले जगणे सुसह्य होईल व वाढत्या तापमानापासून संरक्षण होईल. झाडे लावण्याबरोबर ती जगवणे काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धन चळवळीत आपण सहभाग घेऊन निसर्ग वाचवूया.

प्रास्ताविक अंकुश सोळंकी यांनी केले. सूत्रसंचालन कु. जिया तांबोळी हिने केले तर आभार ओम रणवरे याने मानले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र घाडगे व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!