उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वत:ला वाचवा – प्रांताधिकारी सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२४ | फलटण |
सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरू आहे. दिवसाचे तापमान सुमारे ४० अंशावर पोहोचत आहे. या तापमानामुळे उन्हात काम करणार्‍या, फिरणार्‍या लोकांना उष्माघात होण्याचा धोका संभवतो. यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. स्वत:ला व इतरांना उष्माघातापासून वाचविले पाहिजे, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले की, उष्माघात झाल्यास प्रौढांच्या शरीराचे तापमान १०४ फॅरन्हईटपर्यंत (४० डिग्री सेल्सिअस) पोहोचते. शरीराचे स्नायू आखडून त्या व्यक्तीस मळमळते, उलटीचा त्रास होतो. त्यास चिंता वाटते व चक्कर येते. हृदयाचे ठोके वाढून धडधडते, तर लहान मुलांमध्ये मुले जेवण करण्यास नकार देतात. चिडचिड करतात, त्यांच्या लघवीचे प्रमाण कमी होऊन डोळे शुष्क होतात. कुठूनही रक्तस्त्राव होतो. तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होते. ही उष्माघाताची लक्षणे जाणवतात.

उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढलेले असते, ती व्यक्ती बेशुध्द होते. तसेच ती व्यक्ती गोंधळलेले राहून त्यास व्यक्तीस प्रचंड घाम येतो. अशी व्यक्ती नजरेस पडल्यास त्वरित १०८/१०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उष्माघाताचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करा.

  • संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे.
  • शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा.
  • शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.

उष्माघातापासून बचाव करा :

काय करायचं –

घराबाहेर पडण्यापूर्वी भरपूर पाणी प्या. सुती, सैल आणि आरामदायी कपडे घाला. भरपूर ताजे अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडा. उन्हात बाहेर जाताना डोके झाका. टोपी, कपडा, छत्रीचा वापर करा. पाणी, ताक, ओआरएस, पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, लिंबूपाणी, आंबा, पन्हे इ. घरगुती पेय प्या.

काय करू नये –

रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नका. उन्हात अधिक वेळ राहू नका. तिखट, मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नका. नेहमी पाणी सोबत ठेवा. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका. ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवा. कुलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नका.

उष्णतेच्या लाटेदरम्यान काय करावे?

  1. हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.
  2. पुरेसे पाणी प्या.
  3. सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत.
  4. गॉगल/छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे.
  5. प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी.
  6. थंड पाण्याने आंघोळ करावी.
  7. घराबाहेरील उपक्रम/ मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.

उष्णतेला हरविण्यासाठी जनतेला आवाहन आहे की, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे, असे आवाहनही फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!