दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण |
स्वातंत्र्यवीर सावरकरांना धर्माचा शिक्का मारून केंद्रित करू नका, वीर सावरकरांना आपण सर्वांनी ओळखणे गरजेचे आहे. क्रांतीचे बीज पेरण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले आहे, असे उद्गार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेदरम्यान काढले.
यावेळी फलटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, बाळासाहेब भोसले, प्राध्यापक रवींद्र कोकरे सर, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका भाजप अध्यक्ष बजरंग गावडे, माजी नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. प्रवीण आगवणे, सचिन कांबळे पाटील, बाळासाहेब ननावरे, अशोकराव भोसले, महिला आघाडीच्या पदाधिकारी उषाताई राऊत, मुक्ताताई शहा व असंख्य सावरकर प्रेमी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की, सावरकरांसारखा वेगळा विषय ऐकण्यासाठी येथे असंख्य लोक आले आहेत. त्याचे मला आश्चर्य वाटत आहे. सावरकरांच्या विषयी बोलताना अनेक वक्त्यांनी अनेक विचार मांडले. आपण शाळेत असल्यापासून सावरकरांनी जागृत केलेला स्वातंत्र्याच्या क्रांतीचा विचार ऐकत आलो, वाचत आलो आहे. काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून ते स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी बोटीतून मारलेली उडी हे अंगावर शहारे आणणारे आहे. सावरकर हा विचार होता. इंग्रजांबरोबर लढण्यासाठी त्यांनी क्रांतीची बीजे पेरली. विज्ञानवादी व अस्पृशता मिटवणारे सावरकर हे फार कमी लोकांना माहीत आहेत.शेवटपर्यंत सावरकर हे आपल्या स्वातंत्र्याच्या विचारापासून परावृत्त झाले नाहीत, असेही शेवटी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सांगितले.
‘मी सावरकर’ या विषयावर व्याख्यान देताना प्राध्यापक रविंद्र कोकरे सर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. सावरकर समजून घेताना आपल्यामध्ये सावरकरांची प्रतिमा उजवे – डावे, थोडेसे गोंधळ करणारी निर्माण केली आहे.खरे सावरकर कोण होते, सावरकरांचे विचार काय होते, हे समजून घेणे गरजेचे आहे. सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जे काही योगदान दिले आहे, ते समजणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मापासून ते स्वातंत्र्यलढ्याच्या योगदानापर्यंतचा इतिहास व्याख्यानातून प्रा.कोकरे सरांनी मांडला. ही गौरव यात्रा कुठल्या पक्षाची नसून तत्वाच्या विचारांची यात्रा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, यावेळी नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, बजरंग गावडे यांनी सावरकरांचे विचार व जीवनपट श्रोत्यांपुढे मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सावंत यांनी केले तर आभार अमोल सस्ते यांनी मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश जंगम यांनी केले.