“सावरकर-गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा”; जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । मुंबई । अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणार्‍यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजित पवार यांच्यावर टीका करणार्‍यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले. तसेच, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळंशांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही ते म्हणाले.

गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणार्‍या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरुन बरीच वादावादी झालेली आहे. खरंतर निष्कारण हा वाद काढण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य असे निर्मिलेले होती. मराठा हा व्यापक शब्द होता; मराठा ही व्यापक संकल्पना होती अन् त्यामध्ये सर्व समाविष्ठ झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते.  त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले, असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत.

समकालिन जेवढे इतिहासकार आहेत; त्यामध्ये जेवढे परकिय इतिहासकार आहेत; त्या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगले लिहून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन राज्याभिषेक करुन घेतले, असे प्राच्य इतिहासकार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले आहे. शाक्त म्हणजे काय तर, स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करणे! छत्रपती संभाजी महाराज हे शाक्त परंपरेचे-संस्कृतीचे अभ्यासक होते. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होते. या स्वराज्यात आपण सगळेच आलो आहोत. स्वराज्य हे जात-धर्म विरहित होते. ते स्वराज्य रक्षक होते म्हणजेच ते सर्वांचेच रक्षण करायचे ना? कोणत्याही प्राचीन किंवा समकालिन इतिहासकाराने त्यांना धर्मवीर असे कुठेही म्हटलेले नाही.

स्वराज्याचे रक्षण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती; तीच भावना छत्रपती संभाजी महाराजांचीही होती. जी परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविली; तीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनीही चालविली. जर एवढेच आहे तर या ठिकाणी दोन पुस्तकांची उदाहरणे देतो!  त्यापैकी एक आहे, ‘सहा सोनेरी पाने’! त्यामध्ये शिवरायांच्या राज्याबद्दल काय म्हटले आहे हे सांगून मला नवीन वाद निर्माण करायचा नाही. पण, सावरकरांनी सहा सोनेरी पाने या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे ते वाचण्यायोग्यही नाही. “त्यांना मदिरा आणि मदिराक्षीचा नाद होता” असे सावकरांनी लिहिले आहे. तसेच, शिवाजी महाराजांचा नाकर्ता पुत्र असेही सावरकरांनी लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या पोटी नाकर्ता पुत्र जन्माला आला, असे सावरकर म्हणत आहेत.

दुसरे पुस्तक म्हणजे बंच ऑफ थॉट्स; त्यामध्ये गोळवलकर म्हणतात की, “संभाजी महाराज हे बाई आणि बाटलीच्या आहारी गेले होते. अन् त्यांची खंडो बल्लाळ यांच्या बहिणीवर वाईट नजर होती.” नाटकाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राजसंन्यास आणि इथे ओशाळला मृत्यू या नाटकांमध्ये संभाजी महाराजांना स्त्री लंपट आणि दारुडा म्हणून दाखविण्यात आले. याबद्दल कधीच कोणी बोलले नाही. आम्ही वारंवार त्यावर बोलत आलो आहोत.आम्ही पहिल्यापासून छत्रपती संभाजी राजांना स्वराज्य रक्षक असेच म्हणत आहोत. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते, ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी, येथेच तर खरा इतिहास दडला आहे. म्हणूनच आपण सांगत आहोत की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका!

इतिहास वाद वाढवतो. कारण, कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळंशांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती असेही आव्हाड यावेळी म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!