
फलटण येथील नामवंत व्यावसायिक दिलीप शिंदे यांचे सुपुत्र सत्यजित शिंदे यांची अमेरिकेतील ‘हुंडाई’ कंपनीत ‘एनर्जी मॅनेजमेंट सिमुलेशन इंजिनिअर’ पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ४ मार्च : बांधकाम क्षेत्रातील नामवंत फर्म ‘मे. सगुणामाता कन्स्ट्रक्शन’, फलटणचे दिलीप शिंदे यांचे कनिष्ठ सुपुत्र सत्यजित शिंदे यांनी अमेरिकेत घवघवीत यश संपादन केले आहे. सत्यजित यांची अमेरिकेतील मिशिगन (Michigan) येथील ‘हुंडाई अमेरिका’ (Hyundai America) या नामांकित कंपनीत ‘एनर्जी मॅनेजमेंट सिमुलेशन इंजिनिअर’ (Energy Management Simulation Engineer) या उच्च पदावर निवड झाली असून, ते दि. २ मार्चपासून कंपनीत रुजू झाले आहेत.
कठोर परिश्रमातून मिळवले यश
सत्यजित शिंदे यांनी अमेरिकेतील क्लेमसन युनिव्हर्सिटीमधून (Clemson University, America) ‘एम.एस. ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग’चे (M. S. Automotive Engineering) शिक्षण पूर्ण केले आहे. उच्च शिक्षणासाठी ते १० ऑगस्ट २०२३ रोजी अमेरिकेला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेल्या सुमारे ६ महिन्यांपासून ते सातत्याने अमेरिकेतच नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
अमेरिकेतील सध्याच्या कठीण वातावरणात नोकरी मिळवणे आव्हानात्मक वाटत असतानाच, त्यांच्या कठोर परिश्रमाला (Hardworking) आणि प्रामाणिकपणाला (Sincerity) यश आले आणि त्यांची एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर निवड झाली. त्यांच्या या यशाचा संपूर्ण शिंदे परिवाराला सार्थ अभिमान असल्याचे त्यांचे वडील दिलीप शिंदे यांनी आवर्जून नमूद केले.
आमदार रामराजेंनी व्यक्त केलेला विश्वास ठरवला सार्थ
“विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरून परदेशी उच्च शिक्षण घेत आपल्या देशाची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा अधिक तेजस्वी करावी,” अशी अपेक्षा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्यजित यांच्या अमेरिकावारीपूर्वी आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केली होती. हुंडाईसारख्या जागतिक कंपनीत इंजिनिअर म्हणून रुजू होत सत्यजितने तो विश्वास सार्थ ठरवला आहे.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
या उत्तुंग यशाबद्दल सत्यजित शिंदे यांचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच, मे. सगुणामाता कन्स्ट्रक्शनचे यशवंत पाटील, बिल्डर्स असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, विद्यमान अध्यक्ष महेंद्र जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांचे कौतुक केले आहे.
