‘शेतकरी जगाचा पोशिंदा, पण स्वतः मात्र उपाशी!’ अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वसंत काटे यांचे प्रतिपादन; सुरेश शिंदेंच्या ‘सत्याचा आसूड’ कादंबरीचे प्रकाशन


ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे लिखित ‘सत्याचा आसूड’ कादंबरीचे प्रकाशन अमेरिकेतील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. वसंत काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बदलत्या परिस्थितीवर आणि ग्रामीण जीवनातील वेदनेवर मार्मिक भाष्य केले.

स्थैर्य, फलटण, दि. ०८ जानेवारी : “शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन पूर्णपणे निराळे आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज बदलत्या नैसर्गिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे स्वतः मात्र उपाशी मरत आहे, किंबहुना त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे,” असे मनोगत आणि चिंतन अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ (Cardiologist) डॉ. वसंत काटे यांनी व्यक्त केले. ते फलटण येथील ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे लिखित ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रा. विजय खुडे, भरत सुरसे, साहित्यिक रविंद्र वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाशझोत

डॉ. काटे पुढे म्हणाले की, “अनियमित पाऊस, अतिवृष्टी आणि हवामानातील बदल या नैराश्याच्या गर्तेत शेतकरी अडकला आहे. त्यातच शेतीसाठी लागणारी महागडी कीटकनाशके, बी-बियाणे आणि वाढलेला खर्च, त्या बदल्यात पिकांना न मिळणारा योग्य भाव, आधुनिक बाजारपेठ तंत्रज्ञानाचा अभाव आणि माल बाजारात पोहोचवण्याच्या अडचणी या चक्रव्यूहात बळीराजा सापडला आहे. या सर्व प्रश्नांवर ‘सत्याचा आसूड’मधून सुरेश शिंदे यांनी प्रकाशझोत टाकला असून ही कादंबरी ग्रामीण जीवनातील वेदना प्रभावीपणे मांडते.”

इंग्रजी अनुवादाची गरज: महादेव गुंजवटे

अध्यक्षीय भाषणात मसापचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी सुरेश शिंदे यांच्या साहित्याचा आढावा घेतला. त्यांनी सुरेश शिंदे यांच्या दिवंगत पत्नी सौ. सुलेखा शिंदे यांच्या ‘साळवणाची खोप’, ‘मालकाचं खातं’, ‘लेखकाचं घर पेलताना’ या गाजलेल्या साहित्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “‘सत्याचा आसूड’मध्ये शेतकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. ही व्यथा जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी डॉ. वसंत काटे यांनी या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करून ती प्रकाशित करावी, जेणेकरून देश-विदेशातील वाचकांना याचा फायदा होईल.”

या कार्यक्रमास साहित्य प्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. लेखक सुरेश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!