
दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2024 | फलटण | बॅ. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनी दि. ३ डिसेंबर १९५४ पासून देशभर वकील दिेन (ॲडव्होकेट डे) साजरा करण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आणून देत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी परदेशात कायद्याचा अभ्यास करुन एलएलएम (LLM) पदवी संपादन केली, ते घटना समितीचे सदस्य होते याची आठवण देत फलटण वकील संघाने वकील दिनाचे औचित्य साधून संघातील ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांचा सन्मान केला हे अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. पी. व्ही. चतुर यांनी केले.
फलटण वकील संघाच्यावतीने यावर्षी वकील दिनानिमित्त (ॲडव्होकेट डे) ज्येष्ठ विधीज्ञांचा सत्कार व त्यांचे मार्गदर्शन असे नियोजन केले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. पी. व्ही. चतुर बोलत होते. अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब सरक होते, यावेळी फलटण न्यायालयातील सर्व न्यायाधीश, सर्व कर्मचारी, वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
नवीन वकिलांनी ज्येष्ठ वकिलांच्या ज्ञान व अनुभवांचा विचार करुन त्यांचे मार्गदर्शन नेहमी घ्यावे, ज्येष्ठ वकील यांचा सन्मान करावा असे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. पी. व्ही. चतुर यांनी सूचित केले. न्यायाधीश व पक्षकार यांचे मधील वकील हा दुवा असून योग्य तो न्याय देणे कामी वकिलांची भूमिका नेहमीच महत्वाची, निर्णायक आणि न्यायदान प्रक्रियेत आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. पी. व्ही. चतुर यांनी सर्व वकिलांना वकील दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
फलटण वकील संघाच्यावतीने गेली ४० वर्षे पेक्षा अधिक कालावधीत वकील व्यवसायामध्ये आपले योगदान देऊन न्यायदानाचे कामात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल, फलटण वकील संघटनेचे २५ ज्येष्ठ सन्माननीय सदस्यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ सदस्यांच्यावतीने ॲड. मानसिंगराव कदम व ॲड. एन. एम. यादव यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या वकिलीच्या कार्यकाळातील आढावा घेतला आणि नवीन वकिलांनी ज्येष्ठ विधीज्ञांच्या अनुभव व ज्ञानाचा उपयोग करुन घ्यावा, ज्येष्ठांचा आदर करुन त्यांचा योग्य सन्मान राखावा असे आवाहन केले.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब सरक यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाचे स्वरुप विशद करताना फलटण वकील संघाने ज्येष्ठांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करुन त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा लाभ नवीन वकिलांना करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲड. मयुरी शहा यांनी, समारोप व आभार प्रदर्शन वकील संघाचे सचिव ॲड. सुरज सोनवलकर यांनी केले.
या समारंभात फलटण वकील संघाच्या २५ ज्येष्ठ सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यामध्ये ॲड. मानसिंगराव कदम, ॲड. एन. एम. यादव, ॲड. धनंजय क्षीरसागर, ॲड. चतुर्भुज गावडे, ॲड. शामराव सस्ते, ॲड. ए. के. शिंदे, ॲड. विजय भोसले, ॲड.रविंद्र शिंदे, ॲड. दिपक रुद्रभटे, ॲड. नारायण बोडरे, ॲड. श्रीरंग फुले, ॲड. प्रकाश शिंदे, ॲड. रविंद्र सहस्त्रबुद्धे, ॲड. विजयराव नेवसे, ॲड. बाबुराव गावडे,ॲड. हनुमंत शिंदे, ॲड. अजित शिंदे, ॲड. रामदास कोरडे, ॲड. अशोकराव जाधव, ॲड. भानुदास भागवत, ॲड. मिलींद लाटकर, ॲड. दत्तात्रय शिंदे, ॲड. हिंदुराव जगताप, ॲड. देविदास खिलारे, ॲड. तानाजी दळवी यांचा समावेश होता.