स्थैर्य, खटाव, दि. ०५ : सातेवाडी (ता. खटाव) येथील सचिन भाऊसाहेब देशमुख यांची भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून एकमेव निवड झाली आहे. ते कोलकत्ता (प.बंगाल) येथील कलईकोंडा एअरपोर्टवर सुपर क्लासवन अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. ते येरवडा (पुणे) पोलीस ठाण्यातील हावलदार भाऊसाहेब देशमुख यांचे सुपुत्र आहेत.
हावलदार देशमुख यांची बहुतांशी नोकरी पुणे जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे सचिन यांचे शिक्षण पुणे येथील नामवंत फर्ग्युसन विद्यालय, एस. पी. कॉलेज या ठिकाणी झाले आहे. 12 वी विज्ञान परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बी.बी.ए. व तद्नंतर एम.बी.ए. केले. एम.बी.ए. झाल्यानंतर वायुदलाच्या परिक्षेच्या माध्यमातून त्यांनी निवड झाली आहे.
या परिक्षेत देशभरातील बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विभागातून केवळ दोन तर महाराष्ट्रातून एकमेव यश संपादन करणारे सचिन देशमुख आहेत. ते वि.का.स.सोसा. चे माजी चेअरमन सुनिल देशमुख यांचे पुतणे होत. ग्रामीण भागातून उच्च पदावर हवाई झेप मारणार्या देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ही तर माऊलींची कृपा : देशमुखयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना हवालदार भाऊसाहेब देशमुख म्हणाले, सचिन हा शाळेत पहिल्यापासूनच हुशार होता. कोणत्याही क्लासशिवाय त्याने सर्व शालेय परिक्षेत यश मिळविले होते. केवळ बौध्दिक हुशारीच्या जोरावर त्याने हवाई दलातही भरारी घेतली आहे. आपण गेली अनेक वर्षे पुणे जिल्ह्यात पोलीस दलात सेवा करत आहोत. निवृत्तीला काही महिनेच बाकी आहेत. योगायोगाने आळंदी जवळच्या अनेक पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आयुष्यभर प्रामाणिक नोकरी केली. या प्रामाणिक नोकरीमुळेच आपल्या कुटुंबावर ज्ञानेश्वर माऊलींची चांगली कृपा झाल्याने मुलाचे उच्च शिक्षण व मोठ्या हुद्याची नोकरी मिळाली आहे.