सातारच्या सैनिक स्कूलची कामगिरी अभिमानास्पद – मंत्री दादाजी भुसे


दैनिक स्थैर्य । 4 मे 2025। सातारा । राज्यातील सैनिकी शाळांमधील जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन, सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. सातारच्या सैनिक स्कूलची कामगिरी व परंपरा अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून या शाळांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

सातारा येथील सैनिक स्कूलला दादाजी भुसे यांनी शनिवारी भेट दिली. त्यानंतर राज्यातील 38 सैनिकी शाळांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यवतमाळचे खासदार संजय देशमुख, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, सातारा सैनिकी शाळेचे प्राचार्य के. श्रीनिवासन, राज्यातील 38 सैनिकी शाळांचे प्राचार्य, पदाधिकारी, प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, सातारा व चंद्रपूर येथील शासकीय सैनिकी शाळा आणि राज्यातील 38 सैनिकी शाळांमध्ये 12 हजार 224 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती रुजवण्याचे प्रयत्न सैनिकी शाळांमधून झाले पाहिजेत. या शाळा इतर शाळांपेक्षा वेगळ्या असून, यामागे देशप्रेम, राष्ट्रीयत्वाची भावना जोडली गेली आहे. सैनिकी शाळा देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करतात. या शाळांना अनेक आव्हानांचा आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. पीपीई मॉडेल, अभ्यासक्रम, धोरणांची अंमलबजावणी, 38 सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र बोर्डाची मागणी, विद्यार्थ्यांना फील्डवरील प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी नियोजन असावे. कमांडंट नियुक्तीचे धोरण, स्टाफिंग पॅटर्न, एनसीसी, संस्थांचे सबळीकरण यासारख्या अडचणी सोडवण्यासाठी बैठका घेतल्या जातील.

मराठी मंडळाच्या माध्यमातून सीबीएसई पॅटर्नच्या चांगल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. मराठी हे आपले दैवत आहे. इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले गेले पाहिजे, याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सातारा सैनिक स्कूलची कामगिरी अभिमान वाटावा अशी राहिली आहे. या शाळेप्रमाणे काम इतर शाळांना कामगिरी करता यावी, यासाठी सातारा येथे राज्यातील सैनिकी शाळांची बैठक घेतल्याचे दादाजी भुसे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!