दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । सातारा । बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे माजी सदस्य, सातारचे निष्णात फौजदारी विधिज्ञ अॅड. धैर्यशील पाटील तथा डी.व्ही. दादा (८०) यांचे आज सकाळी सातारा येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक गाजलेले फौजदारी खटले तसेच सातार्यातील नगरसेवक शरद लेवे खून खटला, महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील खून खटला अशा महत्वपूर्ण खटल्यांचे काम त्यांनी पाहिले होते. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ ते वकिली व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आज (बुधवारी) सायंकाळी पाच वाजता सदरबझार , सातारा येथील सिध्दार्थ व्हिवा या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
अॅड. डी.व्ही. पाटील यांचा जन्म १४ जुलै १९४३ रोजी बडोदा येथे झाला. इस्लामपूर जवळील पेठ हे त्यांचे गाव. वकिलीची पदवी घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यासह देशभर त्यांनी ठिकठिकाणच्या विविध खटल्यांमध्ये काम केले. फौजदारी संहितेवर त्यांची कमालीची पकड राहिली. वकिलीचे काम करत असतानाच संघटन कौशल्य राबवत अनेक सामाजिक संघटनांवर त्यांची निवड झाली. गोरगरीब, कष्टकरी व श्रमिकांसाठी त्यांनी अहोरात्र काम केले. कामगार व कष्टकरी समाजासाठी त्यांचे काम महत्वपूर्ण राहिले असून डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. सर्व श्रमिक संघ , सर्व श्रमिक महासंघ , लाल निशाण पक्षाचं ते सदस्य होते एसटी कामगार संघटना सातारा विभागाचे ते अध्यक्ष होते तसेच सातारा म्युनिसिपल कामगार युनियनचे ते सक्रिय अध्यक्ष होते त्याचबरोबर कॉम्रेड व्ही एन पाटील स्मारक समितीचे ते सदस्य सचिव होते धरणग्रस्त चळवळ दुष्काळग्रस्तांची पाणी चळवळ तसेच साताऱ्यातील पुरोगामी चळवळी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.
अॅड. डी.व्ही. पाटील यांच्या मागे पत्नी एडवोकेट दीपा पाटील , मुलगा अॅड. सिध्दार्थ पाटील , दुसरा मुलगा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक निशांत पाटील , विवाहित मुलगी सौ शालगर सुना , जावई , नातवंडे असा परिवार आहे. एडवोकेट धैर्यशील पाटील यांचे अंत्यदर्शनासाठी समाजातल्या विविध थरातून व कायदा क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी राग लावली होती कामगार कष्टकरी चळवळीतीलही अनेक कार्यकर्ते येऊन आपल्या नेत्याला अखेरचा लाल सलाम करून गेले