दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा येथील आयुर्वेदिक अर्कशाळेचे मॅनेजर डॉ. उदय देशपांडे हे ध्येयवादी , व्यवस्थापन कुशल व संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असलेले होते. त्यांच्या ध्येयवादी व निस्वार्थी सेवेचा आयुर्वेदिक अर्कशाळेला नक्कीच फायदा झाला असे गौरवोद्गार आयुर्वेदिय अर्कशाळेचे चेअरमन रवींद्र हर्षे यांनी काढले. साताऱ्याच्या आयुर्वेदिय अर्कशाळेचे मॅनेजर डॉक्टर उदय देशपांडे हे चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालेबद्दल त्यांचा कंपनीचे चेअरमन डॉ. रवींद्र हर्षे यांच्या हस्ते विविध भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. रवींद्र हर्षे बोलत होते.
यावेळी संचालक सर्वश्री शामसुंदर गोखले , डॉ. अच्युत गोडबोले , डॉ धनंजय बोधे , डॉ. दिलीप पटवर्धन , एडवोकेट नितीन वाडीकर , अनिल काटदरे तसेच नूतन मॅनेजर सतीश देशपांडे , नूतन सेक्रेटरी मकरंद एरंडे हे उपस्थित होते.
डॉ. उदय देशपांडे यांच्या संचालक मंडळ ,भागधारक , कच्चामाल व्यापारी , विक्रेते व वितरक ,सरकारी विभाग , बँकर्स व सर्व सेवक वर्ग यांच्याशी योग्य संवाद व समन्वय साधत कंपनी सतत प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न याबद्दल सर्वच वक्त्यांनी मनोगतामध्ये त्यांचे कौतुक केले. यावेळी मोहन तगारे , विनायक गोखले , पल्लवी कुलकर्णी , पांडुरंग पवार , नूतन व्यवस्थापक सतीश देशपांडे , नूतन सेक्रेटरी मकरंद एरंडे यांनी मनोगते व्यक्त केली व संस्थेचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला .
निरोप समारंभामध्ये सत्काराला उत्तर देताना डॉ. उदय देशपांडे यांनी अर्कशाळेतील आपल्या कारकिर्दीचा आढावा घेत आठवणींना उजाळा दिला व सर्वांचे आभार मानले. तसेच त्यांच्या कारकीर्दीत करावयाच्या काही राहिलेल्या कामांविषयी उल्लेख केला. भविष्यात अर्कशाळेला विक्रीसंबंधी काही नवीन योजनाही सुरू कराव्या लागतील. तसेच काही नवीन उत्पादनेही आणावी लागतील याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. संस्थेस भविष्यात कोणतीही मदत लागल्यास नेहमीच सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. प्रास्ताविक सेल्स मॅनेजर भास्कर काळे यांनी केले. आभार योगेश देशपांडे यांनी मानले.