स्थैर्य, सातारा, दि. 05 : पोवईनाका परिसरात बहुचर्चित टी अँड टी इन्फ्रास्क्टचर कंपनीचे ग्रेडसेपरेटरचे काम सुरु आहे. काम सुरु झाल्यापासून गेल्या दोन वर्षात कंपनीच्या जेसीबींकडून दोन ते तीन वेळा सातारा शहर व उपनगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. अशा प्रकारे जलवाहिनी फुटल्यानंतर अर्ध्या सातारा शहरासह उपनगरांना पाण्यापासून वंचित रहावे लागते. मे महिन्यात देखील अशाच प्रकारे मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्याला दोन आठवडे उलटत नाहीत तोवरच सायन्स कॉलेजसमोर कंपनीच्या कामात जलवाहिनी फुटल्याने सातारकरांना दोन दिवस पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी सातत्याने झटणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे अधिक्षक अभियंता संजय गायकवाड 31 मे रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांच्यानंतर साताऱयात येण्यासाठी स्पर्धा सुरु झाली असली तरी संजय गायकवाड यांनी दोन वर्षात केलेले काम ते करतील की नाही अशी साशंकता आहे. मे महिन्यात अशाच प्रकारे ग्रेडसेपरेटच्या कामात मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी गायकवाड यांनी तातडीने ते काम करण्याबाबत सूचना करुन दुरुस्ती करुन घेतली होती.
या घटनेस काही दिवस उलटत नाही तोवर गुरुवारी ग्रेडसेपरेटरचे काम सुरु असतानाच सायन्स कॉलेजनजिक ओढय़ातून शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे नियमित होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तातडीने पाईप दुरुस्ती काम सुरू केले आहे. मात्र, मुळातच ग्रेडसेपरेटचे काम सुरु असताना जलवाहिनी कोठून गेली आहे याबाबत प्राधिकरणाकडून टी अँड टी ला कल्पना दिली गेली नव्हती का? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरवेळी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर ती दुरुस्त करण्याचे काम बांधकाम विभागाकडून मात्र प्राधिकरणाचे ठेकेदार करत असतात.