तब्बल साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर कोरोनाने सातारा शहरात शिरकाव करण्यात यश मिळवले आहे. कोरोनामुळे सातार्यात दोन जणांचे झालेले मृत्यू हे धोक्याचे संकेत आहेत. त्यामुळे सातारकरांनी आता सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. कोणत्याही कामाव्यतिरिक्त रस्त्यावर न येता आपलीही घरी कोणी तरी वाट पाहतेय, याची जाणीव आता प्रत्येकालाच होणे गरजेचे आहे.
साडेतीन महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जारी करत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, हॉटेल्स, भाजी मंडई पूर्णपणे बंद ठेवली होती. कामाशिवाय रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने आणण्यास मज्जाव केला होता. पोलीस प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही रस्त्यावर वाहने आणली जात असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लॉकडाउन संपेपर्यंत ती वाहने पोलिसांनी जमा करून घेतली होती. कठीण प्रसंगी सातारकरांनी सातारा जिल्हा प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने दुकाने सुरू केली. 1 जुलै रोजी बहुतांश दुकाने, भाजी मंडई सुरू झाली. रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत रस्त्यावर कोणी फिरू नये असे आवाहनही करण्यात आले.
प्रशासनाने दिलेल्या सवलतीचा गैरफायदा उठवत खरेदीसाठी अनेकांनी झुंबड उडवली. ना मास्क, ना सोशल डिस्टन्स अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निदर्शनास येऊ लागली. मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर मुक्त संचार करू लागली. सातारा शहरात कोरोनाचा एकही रुग्ण न सापडल्यामुळे सातारकरांचा मुक्त संचार सुरू होता. घरी कोणी आपली वाट पाहत आहे याचीही काळजी घेतली जात नव्हती अशाच परिस्थितीत सातार्यात कोरोना पॉझिटिव्ह दोन रुग्ण सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. दुर्दैवाने त्या दोघांचाही मृत्यू झाला आणि सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला याच्यावर शिक्कामोर्तब झाले. सातारा तालुक्यामध्ये आतापर्यंत 133 रुग्ण बाधित सापडले असून पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी ते सावधानता बाळगत नसल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सातारा शहरात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही दुकानदार, ग्राहक, वाहन चालक म्हणावी तशी काळजी घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजी मंडई बंद असली तरी रस्त्यावर भाजी विक्री करणारे भाजीविक्रेते सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. बहुतांश ठिकाणी तर भाजी खरेदीसाठी येणारे नागरिक तोंडाला मास्कही लावत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे सातारा शहरात कोरोना आणखी काही दिवस मुक्काम ठोकणार याची भीती निर्माण झाली आहे. शहरातून कोरोनाला पळवून लावायचे असेल तर प्रत्येकाने सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून तसे वर्तन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रात्री विनाकारण फिरणार्यांवर कारवाईची गरज..रात्री 9 नंतर रस्त्यावर अनेकजण विनाकारण वाहने घेऊन फिरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून येऊ लागले आहे. विशेषत: राजपथ, राधिका रोड, जिल्हा पोलीस मुख्यालय मार्गावर रात्री उशिरापर्यंत विनाकारण वाहने धावत असल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात अशा वाहनचालकांवर शहरांमध्ये कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहने घेऊन फिरण्याचे धाडस चालकांमध्ये निर्माण झाल्यामुळे सातारकरांसाठी ती एक डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांनी आपल्या कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
बोरणे घाटात रंगतेय तळीरामांची मैफल..पर्यटनस्थळांकडे जाणार्या पर्यटकांवर गेल्या काही दिवसात सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली. मात्र या कारवाईत सातत्य न राहिल्यामुळे शनिवारी-रविवारी पर्यटन स्थळाकडे जाण्याचा कल अनेकांमध्ये दिसून येत आहे. ठोसेघरकडे जाणार्या मार्गावर बोरणे घाटात सुट्टीच्या दिवशी अक्षरशः तळीरामांची मैफल पाहायला मिळत आहे. या मैफलीला पहिला चाप न बसवल्यास सातारा तालुक्यासह शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ शकतो.
रस्त्यावर थुंकणार्यांवर कारवाई व्हावी..सातारा शहरात धूम्रपान, गुटखा, मावा, तंबाखू, पान यांचे सेवन करणार्यांची संख्या 60 टक्के असल्याचे सांगितले जाते. रस्त्यावर थुंकणे हे कोरोनाला निमंत्रण आहे असे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे असल्यामुळे राज्य शासनाने रस्त्यावर थुंकू नये असे आवाहन करत रस्त्यावर थुंकणार्यांवर कारवाई करा, असे निर्देश दिले असतानाही सातारा शहरात रस्त्यावर थुंकणार्या एकाही व्यक्तीवर कारवाई झाली नाही, हे विशेष आहे त्यामुळे अशाप्रकारच्या कारवायांची गरज निर्माण झाली आहे.