
स्थैर्य, सातारा दि. 27 डिसेंबर : सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणार्या साहित्यिकांचा पाहुणचार साहित्यप्रेमी सातारकर याही संमेलनात करणार आहेत. संयोजन समितीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था सातारकर आपल्या घराघरांत करणार आहेत. या निमित्ताने सातारकर साहित्य व संस्कृतीचा जागर करीत, साहित्यिकांचा सहवास घेत त्यांच्या लिखाणाचे पैलू जाणून घेणार आहेत. तसेच साहित्यिकही आपल्या चाहत्या वाचकांच्या आवडीनिवडी, विचार जाणून घेत पुढील साहित्यकृतींना वेगळा आयाम देऊ शकणार आहेत.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातार्यात 1993 साली 66वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले होते. त्यांच्या संकल्पनेतून संमेलनाला येणार्या अनेक साहित्यिकांची सातारकरांच्या घरोघरी निवासाची सोय करण्यात आली होती. हीच अनोखी संकल्पना त्यांचे सुपुत्र व 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा राबविली जाणार आहे.
समृद्ध साहित्यिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. सातार्यातील नगरवाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी (सातारा) हे साहित्य आणि संस्कृतीचे प्रेरणास्थान आहेत. सातारा नगरीत होत असलेल्या साहित्यविषयक उपक्रमांना तसेच ग्रंथ प्रदर्शनांना सातारकर नेहमीच मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.
घरोघरी साहित्यिक ही संकल्पना राबविण्याचे निश्चित झाल्यानंतर सातारकर साहित्यप्रेमींनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सातारकरांनी आपल्या आपुलकीपूर्ण स्वभावानुसार राज्यातील विविध भागातून संमेलनाला येणार्या साहित्यिकांना आपल्या निवासस्थानी राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या उपक्रमासाठी निवासी सुविधा अशी कमिटी स्थापन करण्यात आली असून त्याचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल आहेत. कमिटीमध्ये पद्माकर पाठक, अॅड. सीमा नुलकर, डॉ. संदीप श्रोत्री यांचा समावेश असून त्यांना नंदकुमार सावंत आणि विनोद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
साहित्यिकांशी मनमुराद संवाद साधताना सातारकर साहित्यिकांची फक्त निवास व्यवस्थाच करणार नसून आपल्या निवासस्थानापासून संमेलन स्थळापर्यंत जाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. संमेलनाविषयी वृत्तपत्रात आलेले वृत्तांकन साहित्यिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील सातारकर तत्पर राहणार आहेत.

