सातारकरांनी साहित्य संमेलनाच्या पाठीशी रहावे

अ. भा. मराठी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 26 जून 2025 । सातारा । सातार्‍यात होणारे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचे उद्दिष्ट पार करावयाचे आहे. सातार्‍याचे मावळे या उद्दिष्टामध्ये कधीही कमी पडणार नाहीत, कोणत्याही संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. त्यामुळे सातारकरांनी 99 व 999 या निधी संकलनाला सर्वांनी पाठींबा द्यावा व तन-मन-धन अर्पण करून साहित्य संमेलनाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.

सातारा येथील पाठक हॉलमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात संस्थानिहाय बैठका सुरू आहेत. यामध्ये बुधवारी सातारा शहरातील पत्रकार, वृत्तपत्रांचे निवासी संपादक, जिल्ह्यातील साहित्यिक, आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुपचे सदस्य, नगरवाचनालय सदस्य, प्राध्यापक शिक्षक तसेच सर्व सदस्य या बैठकीस उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या बैठकीला विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार हरीश पाटणे, मसाप शापुरी शाखा, मावळा फाऊंडेशनचे नंदकुमार सावंत, किशोर बेडकिहाळ, वजीर नदाफ, संजय माने, अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, अनिल जठार, तुषार महामुलकर, डॉ. संदीप श्रोत्री, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक मार्गदर्शक शिरीष चिटणीस, वैदेही कुलकर्णी, प्राचार्य यशवंत पाटणे, श्रीराम नानल, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, राजेश सोळसकर, हनुमंत पाटील, सातारा शहर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे आणि पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

विनोद कुलकर्णी म्हणाले, सातारकरांना 99 वे साहित्य संमेलन यशस्वी करण्याची संधी आहे. कार्यकर्ता म्हणून अपेक्षा न ठेवता काम करा, अगदी सतरंजी उचलण्यापासून वेगवेगळ्या नियोजन समितीवर काम करा. साहित्य संमेलनाला महामंडळाकडून येणारे कार्यक्रम राबवावे लागतात. शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशन हे यजमानपदी आहेत. नवोदित साहित्यिकांनी मला संधी मिळेल, याची वाट न पाहता वेगवेगळ्या विषयांवर चौफेर लिखाण करणारी पुस्तके तयार ठेवा, त्याचे प्रकाशन साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर घेता येईल. साहित्य संमेलन आणि कार्यक्रम नियोजनाचा दांडगा अनुभव असल्याने शाहूपुरी शाखा मसाप यांनी हे संमेलन मागण्याचे धाडस केले आहे. निधी संकलनात आम्ही कोठेही कमी पडणार नाही, हे संमेलन तुमचे आमचे सर्व सातारकरांचे आहे.

पत्रकार हरीश पाटणे म्हणाले, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सातार्‍याच्या नेटक्या नियोजनाचा व्यापक संदेश देश पातळीवर जावा, यादृष्टीने सातारकरांनी या संमेलनात सहभागी व्हावे. कोणत्याही कार्यक्रमात त्रुटी राहतात, त्या राहिल्यास त्याच्या सूचना कराव्यात. या संदर्भातील चर्चा ही विशुद्ध असावी. सातारकरांकडून कोणताही वादविवाद होईल, असे वर्तन घडता कामा नये. संमेलनाच्या यशस्वीतेची जबाबदारी ही सातारकरांची आहे. यामध्ये सक्तीच्या हिंदी भाषेला शाहुपूरी सहित्य परिषदेकडून विरोध केंद्र सरकारच्यावतीने हिंदी भाषा सक्तीचा एक वेगळा प्रयोग केला जात आहे. या भाषा सक्तीला महाराष्ट्रामधून विरोध होत आहे. हिंदी भाषेच्या प्रसाराला विरोध नाही. मात्र, त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. हिंदी भाषेची सक्ती करण अजिबात नको आहे, असा तक्रारीचा सूर या बैठकीमध्ये उमटला. या पद्धतीने जर धोरण राबवले जात असेल तर शाहपुरी शाखा सातारा व महाराष्ट्र साहित्य परिषद या सक्तीचा विरोध करत आहे, असा ठराव कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मांडला. या ठरावाला उपस्थित सर्व सदस्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. साहित्य सांप्रदायाचा वारकरी म्हणून कोणत्याही जबाबदारीसाठी मी तयार आहे.

बैठकीमध्ये पत्रकार श्रीकांत कात्रे यांनी साहित्य संमेलनापूर्वी वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी शाळा व महाविद्यालय यांच्या माध्यमातून साहित्य कृतीचे कार्यक्रम घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पत्रकार हनुमंत पाटील म्हणाले, साहित्य संमेलनात प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवून कार्यकर्ता म्हणूनच मांडवात वावरावे, अजिंक्यतारा हा शहराचा श्वास आहे. अजिंक्यतारा किल्ल्याची थीम साहित्य संमेलनात सहभागी करावी.

पत्रकार मुकुंद फडके म्हणाले, मराठी साहित्य संमेलनामध्ये केवळ ठराविक साहित्यांवर चर्चा होते. यामध्ये रहस्यकथा व चित्रपट साहित्य यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. साहित्य संमेलनाचे वातांकन हे महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट भारताच्या कानाकोपर्‍यामध्ये पोहोचले पाहिजे.

शिरीष चिटणीस म्हणाले, संमेलनात बृहनमहाराष्ट्रासाठी आणि तेथील साहित्य मांडणीसाठी संमेलनात चार तास मिळावेत. निर्विवाद चेहर्‍याचा अध्यक्ष असावा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्यामुळे या संमेलनाची आमंत्रणे महाराष्ट्र बाहेर वेगवेगळ्या राज्यात जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दीपलक्ष्मी पतसंस्थेच्यावतीने 51 हजार व स्वतःची वैयक्तिक 11000 अशी 62 हजार रुपयांची मदत त्यांनी संमेलनासाठी जाहीर केली आहे. तसेच हॉटेल व्यावसायिक संपत जाधव यांनी 51 हजार रुपये, वैशाली राजमाने यांनी दहा हजार रुपये, किशोर बेडकिहाळ यांनी 5 हजार रुपये जमा केले असून त्यानिमित्त त्यांचे सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देणगी देणार्‍या अनेक देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नंदकुमार सावंत यांनी केले. आभार सचिन सावंत यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!