नुपूर नृत्य निकेतन अकादमीच्या बहारदार नृत्याने सातारकर मंत्रमुग्ध

शनिवार ,दि.14 फेब्रुवारी रोजीपुणे येथील संस्कृती नृत्य विद्यालयाच्या कलाकारांचे भरतनाट्यम.


सातारा – भरतनाट्यम सादर करताना  गुरु मीरा मेहता व सहकलाकार. (छाया : अतुल देशपांडे ,सातारा)
स्थैर्य, 13 फेब्रुवारी, सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात आयोजित केलेल्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवामध्ये मुंबई येथील नुपूर नृत्य निकेतन डान्स अकादमीच्या गुरु मीरा मेहता व त्यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम सेवा सादर केली ,या बहारदार नृत्याने सातारकर मंत्रमुग्ध झाले.

गुरु सौ. मीरा मेहता यांनी या आपल्या नृत्य कार्यक्रमाचा प्रारंभ ..पुष्पांजली ..या बहारदार नृत्याने केला .यामध्ये नृत्यकलाकार ही गुरु, ईश्वर ,वादक, गायक आणि उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन करतात आणि हा कार्यक्रम नीट पार पाडावा यासाठी सर्वांचे आशीर्वाद घेतात अशी ही पुष्पांजली आदि तालात सादर झाली. त्यानंतर ..श्लोकम.. या आदितलातील गंभीर नाट्य रागातील रचनेत ..मूषक वाहन ..असणार्‍या विघ्नहर्ता गणपती या देवाची स्तुती आणि त्याचे कौतुक करणारी रचना नृत्यातून सौ. मीरा मेहता ,ऋतुजा जाधव,आणि पुजा बेतू यांनी सादर केली .

यशोदा आणि बालकृष्णाच्या लीलांचे वर्णन असलेले यमुना कल्याण रागातील मिश्र चापु तालातील ..कृष्णा नी बेगने बारो ..या कानडी भाषेतील रचनेवर कृष्णाने आपल्या यशोदा मातेला दाखविलेले विश्वरूप दर्शन आणि त्याचा सुंदर देखावा नृत्य आणि अभिनयातून या कलाकारांनी सादर केला .रंजिनी माला.. या आदि तालातील रचनेवर जी नृत्यांगना आहे रागिनी तिचे कमळासारखे असणारे डोळे, मृदू मुलायम असे पाय आणि जी जनरंजनी म्हणून ओळखली जाते .तिचे सुंदर वर्णन नृत्यातून सादर झाले. त्यानंतर रेवगुप्ती रागातील ,आदितालातील अन्नमाचार्य यांची ..श्रीमन नारायण.. ही रचना भगवान विष्णू वर सादर करताना उपस्थित कलाकारांना आपल्या नृत्य साधनेचा अनुभव प्रेक्षकांना देता आला .रामचंद्र कृपालु भजमन.. या हिंदी रचनेवर या तीनही कलाकारांनी अतिशय सुंदर असे नृत्य यमन कल्याणी रागात रूपक तालात सादर केले .त्यानंतर एक शुद्ध नृत्य असणारी भगवान शिवाची नृत्याची देवता असणारा नटराज जो चिदंबरम मध्ये स्वतः नृत्य करतो हे वर्णन नृत्यातून सादर झाले. नंतर ..आदूचिदंबरम.. ही रचना बेहाग रागात आदि तालात सादर होताना संपूर्ण विश्वातील भगवान शंकराच्या चिदंबरम येथे असणार्‍या नृत्याच्या विविध आकृती आणि त्याचे सर्व सुरेख वर्णन या नृत्यात सादर होऊन शिवपंचाक्षर स्तोत्राने या रंगलेल्या नृत्य कार्यक्रमाची सांगता झाली.राग मालिका रागातील खंडचापु तालात ही रचना ..शिवपंचाक्षर स्तोत्र.. या नावाने सुप्रसिद्ध आहे .यावेळी या कलाकारांना गायन साथ सुप्रसिद्ध गायक शिवप्रसाद एन.एन.यांनी,मृदुंगावर साथ दीपु कृष्णन यांनी ,व्हायोलिनवर साथ मधुरामन कुट्टी यांनी केली.या नृत्याचे वेळी के.एस.डी. शानभाग विद्यालयाच्या समृद्धी गाडे ने रेखाटलेली चित्रे ही सुरेख होती .या सर्व गायक,वादक आणि चित्रकारांचा सत्कार मंदिराच्या वतीने यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन पत्रकार अतुल देशपांडे यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक नृत्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या सर्व कलाकारांचा सत्कार मंदिराच्या वतीने वासुदेवन नायर ,सौ.कांचन शहाणे, व सौ.उषा शानभाग यांच्या हस्ते करण्यात आला .संगीत व नृत्य महोत्सवामध्ये शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील संस्कृती नृत्य विद्यालयाच्या कलाकारांचे भरतनाट्यम संपन्न होणार आहे .


Back to top button
Don`t copy text!