दैनिक स्थैर्य । दि.१० मार्च २०२२ । सातारा । कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश शांताराम चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस उपअधीक्षक म्हणून ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. दुबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 112.9 कि.मी.च्या या स्पर्धेत 100 देशातील सुमारे 2,500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मंगेश चव्हाण यांनी या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. चव्हाण हे मूळचे सातारा येथील रहिवासी असून त्यांच्या या महापराक्रमाने सातारकरांची छातीही अभिमानाने फुलली असून त्यांच्या यशाने साताऱ्यातील खेळाडूंनाही प्रेरणा लाभली आहे.सध्या ते कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ‘दुबई आयर्न मॅन 2022’ ही स्पर्धा नुकतीच दुबई येथे पार पडली. एकूण 112.9 किमीचे अंतर चव्हाण यांनी अवघ्या साडेसहा तासात पूर्ण केले. यामध्ये 1.9 कि. मी. पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21 किमी धावणे अशा प्रकारात हे अंतर साडेआठ तासात पूर्ण करायचे होते. मात्र, सुमारे 36 डिग्री तापमान सहन करीत हे अंतर त्यांनी कमी वेळेत पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उंचावले.या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्यांचा कसून सराव सुरु होता. कोल्हापुरात कर्तव्य निभावत असताना त्यांनी सराव सुरुच ठेवला होता. त्यामुळे त्यांना हे यश लाभले असून कोल्हापुरात तलाव व रस्ते चांगले असल्यामुळे ‘आयर्न मॅन’ स्पर्धेच्या सरावासाठी योग्य वातावरण असल्याचेही मंगेश चव्हाण यांनी सांगितले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंगेश चव्हाण यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहारे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले. चव्हाण यांनी मिळवलेल्या यशाने कोल्हापूर पोलीस दलातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आयर्न मॅन ठरलेले महाराष्ट्रातील पहिले पोलीस उपअधीक्षक सातारा ही क्रांतीवीरांची भूमी आहे. या भूमीतील अनेकांना विविध क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातारा हे नाव मॅरेथॉनमुळे सातारा सुमद्रापलिकडे गेलेले आहे. त्याच साताऱ्यातील मल्हारपेठेतील रहिवासी असलेले व सध्या कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मंगेश चव्हाण दुबई आयर्न मॅन ठरले आहेत. त्यांचे शिक्षण साताऱ्यातील युनियन स्कूल, सयाजीराव विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये झाले आहे. आयर्न मॅन ठरलेले ते महाराष्ट्रातील पहिले पोलीस उपअधीक्षक ठरलेले असून त्यांच्या कामगिरीचे सातारकरांमधून अभिनंदन होत आहे.6 तास 55 मिनिट 31 सेकंदात टास्क पूर्णआयर्न मॅन किताब पटकावणे ही बाब अंत्यत अवघड असते. त्यातही परदेशात जावून अशी कामगिरी करणेही कठीण असते कारण तेथील वातावरणाशी जुळवून घेत आयर्न मॅन स्पर्धेतील धावणे, पोहणे व सायकलिंग हे टास्क पूर्ण करावे लागतात. दुबई आयर्न मॅन स्पर्धेत 1.9 कि. मी. पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21 किमी धावणे अशा प्रकारात हे अंतर साडेआठ तासात पूर्ण करायचे होते. मात्र, सुमारे 36 डिग्री तापमान सहन करीत हे अंतर मंगेश चव्हाण यांनी अंत्यत कमी वेळेत म्हणजे केवळ 6 तास 55 मिनिटे 31 सेकंदात पूर्ण करत हा आयर्न मॅनचा किताब पटकावत कोल्हापूरकरांसह सातारकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.