दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच सातारा जिल्ह्याच्या अपेक्षांना जोरदार धक्का बसला. साताऱ्याचा पैलवान उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याला गोंदियाच्या वेताळ शेळके याने चार विरुद्ध तीन गुणांनी पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्र केसरी मानाची गदा साताऱ्यात आणण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. बुधवारी दिवसभरात पाच वजनी गटात झालेल्या कुस्त्यांच्या फेऱ्यामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर या तीन जिल्ह्याने वर्चस्व राखले.
कुस्ती स्पर्धेच्या सायंकाळच्या सत्रात साताऱ्याचा किरण भगत माती विभागातून आखाड्यात उतरला होता. या कुस्तीसाठी सातारकर कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. पहिल्या फेरीत किरण भगतने चपळाईने हालचाल करून शेळके याच्यावर दोन एक अशी बढत घेतली. कुंडी डावाच्या माध्यमातून चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फसल्याने त्याला दोन गुणांवर समाधान मानावे लागले. किरण भगत याचे बऱ्याच कालावधी नंतर झालेले आगमन आणि सराव होऊन सुद्धा पट काढण्यात आलेले अपयश यामुळे दोन्ही मल्लाना एकमेकांचा अंदाज येत नव्हता. शेवटच्या दहा सेकंदात वेताळ शेळके याने जोरदार चाल करून दोन गुण मिळवल्याने साताऱ्याच्या किरण भगतला चार विरुद्ध तीन गुणांनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. किरण बरोबर अतुल पाटील जळगाव, रविराज सर्वोदे, शुभम सिदनाळे व 86 किलो वजन गटातून आशिष कवठे यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
वेताळ, शेळके जर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचला तर तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी किरण भगतला परतीच्या फेरीवर यावे लागेल. बुधवारी दिवसभरात झालेल्या विविध वजनी गटातील निकाल पुढीलप्रमाणे- 70 किलो गादी विभाग सोनबा गोंगाने कोल्हापूर याने सुवर्णपदक, सर्वेश यादव मुंबई रौप्यपदक.
57 किलो गादी विभाग- सौरभ इगवे सोलापूर सुवर्णपदक, आणि आतिष तोडकर रौप्य पदक.
92 किलो गादी विभाग – सुशांत तांबोळकर सुवर्णपदक, उदय खांडेकर बीड रौप्य पदक.
70 किलो माती विभाग- पै. निखिल कदम पुणे सुवर्णपदक, पै. संतोष गावडे रौप्य पदक.
57 किलो माती विभाग- पै. ज्योतिबा अटकळे सोलापूर सुवर्णपदक, पै.अमोल बालगुडे रौप्य पदक.
92 किलो माती- पै.अमोल मुंडे बीड सुवर्णपदक, प्रशांत जगताप अमरावती रौप्यपदक