दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । साताऱ्याचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची पदोन्नती असून याबाबत राज्य शासनाने दि. 22 डिसेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी निवडश्रेणी संवर्गात पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती दिली आहे.
पदोन्नतीने त्यांची बदली पुणे जिल्ह्यात होण्याची शक्यता असून याबाबतचा आदेशही शासनाकडून पारित होणार आहे.
राज्य शासनाने आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार व महसूल संवर्ग वाटप नियमानुसार राज्यातील 20 अपर जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यामध्ये रामचंद्र शिंदे यांचा देखील समावेश आहे. पदोन्नतीनंतर त्यांची बदली पुण्याला होणार आहे. दरम्यान, सप्टेंबर 2019 मध्ये रामचंद्र शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
या सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याबरोबर काम करताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. तर त्यानंतर जवळपास दीड वर्षे सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरु होता. या कालावधीत देखील रामचंद्र शिंदे यांनी आपतकालीन स्थितीत अनेक चांगले निर्णय घेत लोकांना दिलासा देण्याचे काम केले होते. कोविडची परिस्थिती हाताळताना त्यांनी प्रशासनला गतीमान केले होते.
त्यांची पदोन्नतीने बदली झाल्याचे कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रामचंद्र शिंदे यांचे पदोन्नतीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.