
स्थैर्य, सातारा, दि. 27 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठीच्या नियोजनाला सातारा शहरासह परिसरात वेग आला आहे. विशेषतः तरुणाई या नियोजनात जास्तीची सक्रिय असून, हा मोका साधण्यासाठी बाजारपेठ देखील सज्ज झाली आहे. विविध हॉटेल्स तसेच चिकन आणि मटण व्यावसायिकांकडून त्यासाठीच्या योजना जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.
2025 वर्ष संपण्यासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी उरला आहे. सरणार्या वर्षातील आठवणींची साठवणूक करत येणार्या 2026 या नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वांनाच आतुरता लागून राहिली आहे. नाताळ सणानंतर नववर्षाच्या स्वागताची अनेक ठिकाणी तयारी सुरू झाली आहे. नववर्षाचे स्वागत जल्लोषी आणि फटाक्यांची आतषबाजी करण्याचे नियोजन शहरातील अनेक तरुणांनी केले असून, त्यासाठीच्या जागा
निश्चितीसह इतर बाबींची जुळणी सध्या तरुणांकडून सुरू आहे. शहरालगतच्या मोकळ्या जागी तसेच गोंगाटापासून दूर राहात नववर्षाचे स्वागत करण्यासाठीचे नियोजन अनेकांनी केल्याचे दिसून येत आहे. जेवणावळीचे बेत देखील आखण्यात येत असून, त्यासाठीची तयारी तसेच इतर बाबींची जुळणी विशेषतः तरुणाईकडून सुरू आहे. यादिवशी चिकण आणि मटणाला असणारी जास्तीची मागणी लक्षात घेत अनेकांनी त्यासाठीच्या योजना देखील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शहरासह परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी देखील नववर्षाच्या स्वागतासाठीचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीच्या सवलत योजना देखील जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. विद्युत रोषणाईमुळे नववर्षाचे वेध आणखी गडद होण्यास सुरुवात झाली आहे.
