
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी आळजापूर (ता. फलटण) गावाला भेट देऊन ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’ची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुणवंतांचा सत्कार केला.
स्थैर्य, आळजापूर, दि. 26 फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्रीमती याशनी नागराजन यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ योजनेच्या पाहणीसाठी आज आळजापूर (ता. फलटण) गावाला विशेष भेट दिली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील विविध विकासकामांची आणि शाळेची पाहणी करत ग्रामस्थांशी व विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला.
या विशेष दौऱ्यात श्रीमती याशनी नागराजन यांचे स्वागत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. किरणताई नलवडे आणि आळजापूरच्या सरपंच सौ. पुष्पा पवार यांनी केले.
लेझीमच्या गजरात स्वागत अन् विद्यार्थ्यांशी संवाद
श्रीमती नागराजन यांनी सर्वप्रथम आळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम पथकाच्या तालावर त्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शाळेची सविस्तर पाहणी केली. गावात नव्याने उभारण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट शाळे’च्या नियोजित जागेची तसेच, जिल्हा परिषद शाळेने नव्याने सुरू केलेल्या ‘संगणक लॅब’ची (Computer Lab) त्यांनी पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.
शाळेतील पाहणीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा २०२५-२६ मध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी श्रीमती नागराजन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
गावातील सुविधांची पाहणी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
शाळेतील कार्यक्रमानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावातील प्रमुख चौक, शुद्ध पाण्यासाठी बसवण्यात आलेला वॉटर फिल्टर प्लँट आणि परिसरातील धार्मिक स्थळांची पाहणी करत ग्रामविकासाचा आढावा घेतला.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाच्या ‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना’बद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि प्रशासकीय स्तरावरील योग्य त्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी गावातील सर्व प्रमुख मान्यवर, ग्रामस्थ आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
