पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर! फलटणमध्ये ‘टाय’; ‘ईश्वरी चिठ्ठी’वर ठरणार ओबीसी महिला सभापती; कोण आहेत दावेदार?; वाचा सविस्तर


सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुका अनुक्रमे २० व १६ मार्चला होणार आहेत. फलटण पंचायत समितीत खासदार गट आणि राजे गटात ८-८ असे समसमान संख्याबळ असल्याने ‘ओबीसी महिला’ सभापतीपदासाठी ईश्वरी चिठ्ठी निघण्याची दाट शक्यता आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ६ मार्च : सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या चाब्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. २० मार्च रोजी, तर जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक दि. १६ मार्च रोजी होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या निवडणुकांच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले असून राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

जिल्हा महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दि. २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात पार पडेल.

त्यापूर्वी, जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आल्या आहेत. या सभांच्या अध्यक्षतेसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

फलटणमध्ये ८ विरुद्ध ८ : सभापतीपदाचा पेच सुटणार कसा?

या संपूर्ण प्रक्रियेत जिल्ह्याचे लक्ष फलटण पंचायत समितीच्या निवडीकडे लागले आहे. फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १६ जागांपैकी महायुती (खासदार गट) आणि राजे गट (शिवसेना) या दोन्ही गटांचे ८-८ सदस्य निवडून आल्याने पंचायत समितीमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ असल्याने आता सत्तेची चावी आणि सभापतीपदाचा फैसला हा नशिबावर म्हणजेच ‘ईश्वरी चिठ्ठी’वर (Draw of Lots) अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे. एखादा गट ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी वेगळी रणनीती आखणार की चिठ्ठी टाकून निवड होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

ओबीसी महिला राखीव; कोण आहेत दावेदार?

आगामी काळासाठी फलटण पंचायत समितीचे सभापतीपद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला’ अर्थात ओबीसी महिला (OBC Woman) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. राखीव प्रवर्गानुसार आणि विजयी उमेदवारांच्या जातनिहाय वर्गवारीनुसार, सध्या दोन्ही गटांत मिळून एकूण ५ महिला सदस्य या पदासाठी पात्र ठरत आहेत.

१. खासदार गट (महायुती) – दावेदार: या गटाकडे सभापतीपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून दोन नावे चर्चेत आहेत:

  • शिवांजली विक्रमसिंह भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस): साखरवाडी-पिंपळवाडी गणातून विजयी. हा गण ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ साठी राखीव होता.

  • शुभांगी तुकाराम शिंदे (भाजपा): वाठार निंबाळकर गणातून विजयी. जरी हा गण ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी होता, तरी शुभांगी शिंदे या ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्या सभापतीपदासाठी पात्र ठरत आहेत.

२. राजे गट (शिवसेना) – दावेदार: राजे गटाकडे संख्याबळानुसार तीन पर्याय उपलब्ध आहेत:

  • सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे (शिवसेना): सांगवी गणातून विजयी. हा गण ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ साठी राखीव होता.

  • आटोळे स्वाती हणमंत (शिवसेना): बरड गणातून विजयी. हा गण ‘सर्वसाधारण महिला’ म्हणून लढवला गेला असला तरी स्वाती आटोळे या ओबीसी महिला प्रवर्गातून येतात.

  • सौ. विजया हनुमंत सोनवलकर (शिवसेना): दुधेबावी गणातून विजयी. दुधेबावी गण हा ‘सर्वसाधारण महिला’ साठी होता, मात्र विजया सोनवलकर या ओबीसी प्रवर्गातील आहेत.

सध्याचे बलाबल पाहता दोन्ही बाजूने ८-८ सदस्य आहेत. सभापती निवडीच्या वेळी जर दोन्ही बाजूने समान मते पडली, तर नियमानुसार चिठ्ठी टाकून निवड केली जाईल. त्यामुळे आता नशीब कोणाला साथ देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!