सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा रणधुमाळी! चार विषय समिती सभापतिपदांसाठी आज निवडणूक; भाजप चौकार मारणार की राष्ट्रवादी-सेना पलटवार करणार?


सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या ऐतिहासिक राड्यानंतर आज चार विषय समिती सभापतींची निवडणूक पार पडत आहे. भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी असा सत्तासंघर्ष पुन्हा रंगणार असून, संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ४ एप्रिल : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान झालेल्या ऐतिहासिक राड्याचे पडसाद अद्यापही ताजे असतानाच, आज (शनिवारी) उर्वरित चार विषय समिती सभापतिपदांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगणार असून, भाजप चारही जागा जिंकून ‘चौकार’ मारणार की राष्ट्रवादी-सेना मागील पराभवाचा वचपा काढत पलटवार करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे लक्ष लागले आहे.

पक्षीय बलाबल आणि मागील राड्याची पार्श्वभूमी:

सातारा जिल्हा परिषदेत सध्या भाजप २७, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना (शिंदे गट) १५, राष्ट्रीय काँग्रेस १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.

मागील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात मोठा राडा झाला होता. सत्तासंघर्ष इतका टोकाला गेला की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांवर चक्क अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. या राजकीय नाट्याचे पडसाद राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेतही उमटले होते आणि सध्या या प्रकरणाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू आहे. याच तणावपूर्ण पार्श्वभूमीवर आजची सभापती निवड प्रक्रिया पार पडत आहे.

या चार महत्त्वाच्या समित्यांसाठी चुरस:

आज होणाऱ्या विषय समिती सभापती निवडीमध्ये खालील चार महत्त्वाच्या समित्यांसाठी सदस्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे: १) शिक्षण व अर्थ समिती २) कृषी व पशुसंवर्धन समिती ३) समाजकल्याण समिती ४) महिला व बालकल्याण समिती

दिग्गज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला:

या चारही समित्यांवर भाजपचाच झेंडा फडकवणार आणि ‘चौकार’ मारणार, असा चंग ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी बांधला आहे. तर दुसरीकडे साताऱ्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनीही सभापतिपदासाठी जोरदार रणनीती आखली आहे.

अध्यक्ष निवडीच्या वेळी तिन्ही पक्षांमधील संघर्ष टोकाला गेला होता. त्यामुळे आता सभापतिपदासाठी पुन्हा तोच संघर्ष पाहायला मिळणार की तिन्ही पक्ष सामोपचाराने या निवडी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इच्छुकांची मोर्चेबांधणी आणि नाराजांची मनधरणी:

सभापती निवडीवेळी मतदान होणार असले तरी बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत आपली नावे पोहोचवण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. विशेषतः, अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असूनही संधी न मिळालेल्या नाराज सदस्यांना विषय समित्यांचे सभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच, सभापतिपदासाठी पक्ष कोणकोणत्या तालुक्यांना संधी देणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत.


Back to top button
Don`t copy text!