
केंद्र सरकारच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’तर्गत सातारा जिल्ह्यात रविवारी पार पडलेल्या पायाभूत साक्षरता परीक्षेत ७ हजार १४९ नवसाक्षरांनी सहभाग नोंदवला.
स्थैर्य, सातारा, दि. १ एप्रिल :केंद्र सरकार पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’तर्गत १५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांमध्ये मूलभूत साक्षरता आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हाभर नवसाक्षरांची परीक्षा नुकतीच पार पडली. यावर्षी जिल्ह्यात तब्बल ७ हजार १४९ नवसाक्षरांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर यांनी दिली आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
२०२२-२३ ते २०२६-२७ या अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता, वाचन, लेखन आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. २९ मार्च) झालेल्या या परीक्षेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यामध्ये ५ हजार ८८७ महिला आणि १ हजार २६२ पुरुषांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये या परीक्षेचे अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते.
गतवर्षीच्या तुलनेत आकडेवारी
गतवर्षी साक्षरता अभियानाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट १६ हजार ४९२ इतके होते. त्यानुसार २१ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेस १६ हजार २६२ असाक्षर प्रविष्ट झाले होते. यावर्षीही प्रशासनाने हा उपक्रम तितक्याच प्रभावीपणे राबवला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रांवर पाहणी
या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी खंडाळा तालुक्यातील पाच शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक व योजना विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या चोख नियोजनामुळे या परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडल्या असून, निरक्षर नागरिकांना साक्षर होण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होत आहे.

