स्थैर्य, सातारा दि. 19 : लॉकडाऊनमुळे काही अंशी चालू असलेले सातारा परिवहन कार्यालयाचे काम नियम आणि अटींसहीत सोमवार दि. 22 जून पासून पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे, अशी माहिती उप-प्रादेशिक परीवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. यामध्ये अनुज्ञप्ती, वाहन, परवाना विषयक कामे यासह वायुवेग पथकाच्या कामांचा समावेश आहे.
अनुज्ञप्ती व वाहनविषयक कामाकरिता सारथी ४.० व वाहन ४.० प्रणालीवर आगाऊ वेळ घेण्याची तरतुद ठेवली आहे. तसेच पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३० सप्टेंबर पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या शिकाऊ अनुज्ञप्ती धारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरणाच्या नियोजित दिनांकाच्या एक दिवस आगोदर वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन वाहन नोंदणी तसेच हस्तांतरण आणि इतर कामकाज यापुर्वीच सुरु केले आहे.
शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी घेताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात येणार आहे. दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. अर्जदार मास्क व हँन्डग्लोज घाजुनच कार्यालयात प्रवेश करतील याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच पक्की अनुज्ञप्ती चाचणी घेण्याआधी, ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनाची व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन केल्यानंतर अशा वाहनांची चाचणी घेण्यात येणार आहे.
अनुज्ञप्ती वाहन व परवाना विषयक कामाकाजाबाबत दैनंदिन नवीन शिकाऊ अनुज्ञप्ती 40, पक्की अनुज्ञप्ती 60 व योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण 50 या प्रमाणे कोटा निश्चित करण्यात आला आहे.
ज्या नागरिकांचे कार्यालयात कामकाज नाही त्यांनी कार्यालयाच्या आवारात येऊ नये. तसेच कार्यालयात येणाऱ्याा नागरिकांनी मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.