सातारा ते पुणे महामार्गाची लवकरच होणार दुरुस्ती; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून ना. गडकरींकडून ५० कोटींची तरतूद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा ते पुणे महामार्गाची (एन.एच.४) अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारे आहे. अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग आणि सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि सातारा जिल्हावासियांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार ना. गडकरी यांनी महामार्ग दुरुस्तीसाठी ५० ते ५५ कोटी निधीची तरतूद केली असून येत्या तीनचार महिन्यात महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, टोल नाक्यावर होत असलेले गैरप्रकार आणि झोल थांबवण्याबाबतही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. गडकरी यांना सांगितले असून लवकरच टोल नाका चालवणारा ठेकेदार बदलणार असल्याचे ना. गडकरी यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना सांगितले. सातारा- जावली मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी सी.आर.एफ. मधून निधी देण्याची मागणीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली असून याबाबतही ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ना. गडकरी कराड दौऱ्यावर आले असताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांची भेट घेतली आणि  महामार्ग दुरुस्तीसंदर्भात खड्ड्यांच्या छायाचित्रांसहित लेखी निवेदन देऊन चर्चा केली. सातारा ते पुणे महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले असून वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. निकृष्ट काम झाल्याने अगदी सुरुवातीपासूनच महामार्गाची आणि सेवा रस्त्यांची मोठ्याप्रमाणावर दुरावस्था, दुर्दशा झालेली आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या कामाबाबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधीत ठेकेदार यांना अनेकदा सुचना करुनही कोणतीही कार्यवाही होत नाही. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले आहेत.
महामार्ग व सेवा रस्त्यांची दुरावस्था तसेच महामार्गावर कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसताना टोल वसुली मात्र सक्तीने केली जाते. याशिवाय टोल नाक्यावर प्रशासकीय अधिकारी, आजीमाजी सैनिक आणि नागरिकांशी नेहमीच उध्दट वर्तन करुन शिविगाळ दमदाटी करण्याचे प्रकार होत असतात. आनेवाडी टोलनाक्यावर मोठा भ्रष्टाचार झाला असून हे सर्व गैरप्रकार थांबवणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात कुठेही जायचे असेल किंवा पुणे, मुंबईला जायचे असेल तर महामार्गावर यावेच लागते पण, महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दररोज अनेक छोटेमोठे अपघात घडत असून अनेकजण जायबंदी होतात तर, वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
महामार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराने सब ठेकेदार नेमले असून महामार्ग व सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नाही. अनेकदा आंदोलनही करावे लागले आहे. जनतेचा रोष वाढला की केवळ मलमपट्टी करुन ठेकेदार पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून बसतात. यामुळे महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून आपण स्वत: या गंभीर परिस्थितीकडे लक्ष द्यावे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि संबंधीत अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हावासियांच्यावतीने ना. गडकरी यांच्याकडे केली. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीची गंभीर दाखल घेऊन येत्या तीन ते चार महिन्यात सातारा ते पुणे महामार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन ना. गडकरी यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले आणि तसे आदेश महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Back to top button
Don`t copy text!