
सातारा तालुका पोलिसांनी सोनगाव परिसरात धडक कारवाई करत कारमधून विक्रीसाठी आणलेले तब्बल ९ लाख रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोल्हापूरच्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ८ एप्रिल : सातारा शहराजवळ तालुका पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांकडून तब्बल ९ लाख रुपये किमतीचे ‘हेरॉईन’ (अमली पदार्थ) जप्त करण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित कोल्हापूर येथील रहिवासी असून, अमली पदार्थांच्या विक्रीच्याच उद्देशाने ते साताऱ्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्याची कारवाई सुरू होती.
अमली पदार्थ विक्रीची गोपनीय माहिती
अक्षय पाटील आणि अलंकार (दोघेही रा. कोल्हापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी हे दोघेजण कारने साताऱ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने गस्त वाढवली आणि संशयितांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.
सोनगाव परिसरात पोलिसांचा सापळा आणि पाठलाग
सोनगाव परिसरात पाळत ठेवून असताना, एक पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद स्थितीत येताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी या कारला थांबवण्याचा इशारा केला.
मात्र, समोर पोलिसांना पाहताच संशयितांची भंबेरी उडाली आणि त्यांनी गाडी न थांबवता तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावता सिनेस्टाईल पाठलाग करून या कारला आणि त्यातील दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या कारची आणि त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे सुमारे ९ लाख रुपये किमतीचे हेरॉईन आढळून आले. साताऱ्यात अमली पदार्थांची तस्करी वाढल्याची चर्चा असतानाच पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

