स्थैर्य, सातारा, दि. २० : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकार्यांनी 10 दिवस लॉकडाउन जाहीर केला आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा तालुका पोलिसांकडून मोळाच्या ओढ्यावर चेकपोस्ट करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. दरम्यान मोळाचा ओढा येथे विनाकारण फिरणार्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणार्या वाहन चालकांवर पोलिसांकडून कारवाईही केली जात आहे. या ठिकाणी कोणत्याही वाहनाला तपासणी केल्याशिवाय शहराच्या हद्दीत पोलीस येऊ देत नाहीत. या चेकपोस्टवर गेल्या 2 दिवसांपासून शहरात जाणारे वाहनधारक लोकांना आडवून वाहनांचे चेकिंग करण्यात येत आहे. याशिवाय लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,असे आव्हानही केले जात आहे. शहरासह उपनगरात अनेक रुग्ण सापडल्याने पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. लॉकडाउनच्या काळात इतरत्र फिरणार्या लोकांना चाप बसण्यासाठी संचारबंदीची अंमलबजावणी केली आहे. ही अंमलबजावणी होण्यासाठी काही मोजकीच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आहे. घरी रहा सुरक्षित रहा असे पोलिसांकडून वारंवार आव्हाने करूनही काहीजण रस्त्यावर दिसत आहेत. यामुळे या ठिकाणी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक कारण नसताना विनाकारण फिरणारे वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही. -सजन हंकारे, पोलीस निरीक्षक सातारा.