
स्थैर्य, सातारा, दि. 12 सप्टेंबर : येथील सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी (ता. 14) जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. त्याचा एक्स्पो शुक्रवार (ता. 12) व शनिवारी (ता. 13) शेंद्रे (ता. सातारा) येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे आयोजिला आहे. या एक्स्पोचे उद्घाटन शनिवारी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते होईल, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सचिव शैलेश ढवळीकर यांनी दिली.
हा एक्स्पो शुक्रवारी (ता. 12) दुपारी 12 ते सायंकाळी सात, तसेच शनिवारी (ता. 13) सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत असणार आहे. या एक्स्पोत देशभरातील नामांकित कंपन्यांचे विविध उत्पादनांचे स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे शूज, स्पोर्ट्सवेअर, तसेच फिटनेसशी संबंधित साहित्य उपलब्ध असेल.
यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांना रेस किट (टी-शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टायमिंग चीप आदी) वितरित केले जाणार आहे. स्थानिक सातारकर धावपटूंनी त्यांचे रेस किट शक्यतो शुक्रवारी (ता. 12) घ्यावे. यामुळे दुसर्या दिवशी बाहेरगावच्या स्पर्धकांना रेस किट सहजपणे घेता येईल व गर्दी टाळली जाईल व सर्वांच्या सोयीसाठी व्यवस्था अधिक सुरळीत राहील, असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे यांनी केले आहे. हा एक्स्पो सर्वांसाठी खुला असून, सातारकरांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.