
दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्हा पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये 353 केसेसमध्ये तब्बल 501 आरोपींवर कारवाई करून दोन कोटी 44 लाख 41 हजार 327 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी दि. 1 ते 15 जून 2022 या कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमा राबवून जिल्ह्यातील जुगार मटका अवैध दारू अवैध गुटखा वाहतूक वाळू वाळू चोरी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची विशेष तपासणी करून अनेक गुन्हे उघडकीस आणले पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांना डिटेक्शनच्या अनुषंगाने खास सूचना दिल्या होत्या.
सातारा जिल्हा पोलिसांनी जबरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून त्यात नऊ आरोपी अटक केले. दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला. घरफोडीच्या अठरा केसेस उघड करून 93 आरोपींना अटक करण्यात आली असून 19 लाख 83 हजार 469 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरी प्रकरणात 17 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून 18 लाख 56 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाराच्या 138 केसमध्ये 259 आरोपींवर कारवाई झाली तर 44 लाख 74 हजार चा मुद्देमाल जप्त झाला. दारूच्या 204 केसेस करून 270 आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे 36 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाळूचोरीच्या 42 प्रकरणांमध्ये सहा आरोपींवर कारवाई झाली तर गांजा प्रकरणांमध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली होती. गुटख्याच्या तीन कारवाई करून आरोपींना अटक करून पाच लाख 70 हजार 365 रुपयांच्या मुद्देमाल जप्त झाला तर इतर पाच केसमध्ये 14 जणांवर कारवाई करून एक कोटी एक लाख पाच हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी 353 केसेसमध्ये 501 आरोपींवर कारवाई करून दोन कोटी 44 लाख 41 हजार 327 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्हा पोलिस अभिनंदन केले आहे.