फलटण तालुक्यातील गुन्हेगार टोळीला दोन वर्षाकरीता तडीपार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ डिसेंबर २०२४ | सातारा | सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणार्या एका टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या टोळीमध्ये मनोज ऊर्फ महेश गणपत इंगळे, वय २४ वर्षे, रा. आखरी रस्ता, मंगळवारपेठ, फलटण, जि. सातारा आणि सोनल गणेश इंगळे, वय ३१ वर्षे, रा. आखरी रस्ता, मंगळवारपेठ, फलटण, जि. सातारा यांचा समावेश होता.

फलटण शहर पोलीस ठाणे येथे या टोळीविरुद्ध दरोडा टाकणे, घरफोडी चोरी करणे, दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे असे अनेक गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांमुळे फलटण तालुका परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार शहा यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची चौकशी  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केली होती. या टोळीतील इसमांवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.

हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांचे समोर या टोळी प्रमुखांची सुनावणी झाली आणि त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे ३४ उपद्रवी टोळयांमधील ११० इसमांना, कलम ५६ प्रमाणे ३८ इसमांना, कलम ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १५२ इसमांविरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो.हवा बापु धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.


Back to top button
Don`t copy text!