श्रीमंत रामराजे पुन्हा शरद पवारांकडे जाणार?; शरद पवारांच्या विधानाने राज्यात चर्चा


दैनिक स्थैर्य | दि. 25 जुन 2024 | फलटण | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. नव्या उमेदवारांना संधी देण्याबाबत पक्षामध्ये सकारात्मक वातावरण आहे, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. तसेच अजित पवार गटात गेलेल्या सर्वच आमदारांना माघारी फिरण्यास बंदी नसल्याचे संकेतही शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पुढच्या काही महिन्यांत अजित पवार गटाला भगदाड पडून अनेक आमदार शरद पवार यांच्याकडे स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा निवडणुकीत पक्षाला मदत केल्याने श्रीमंत रामराजे व त्यांचा गट हा पुन्हा शरद पवार यांच्या कडे स्वगृही परतणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. तर अजित पवार गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून अजित पवार गटामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. तसेच गेल्यावर्षी पक्षात बंड झाल्यानंतर अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदार परत शरद पवार यांच्याकडे परतण्यास इच्छूक आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे अजित पवार गटात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० हून अधिक आमदार हे अजित पवार गटात गेले होते. मात्र नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने लढवलेल्या ४ जागांपैकी तीन जागांवर त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. तसेच प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. तर दुसरीकडे शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या १० उमेदवारांपैकी ८ जण विजयी झाले, तसेच प्रतिष्ठेची बारामतीची जागा जिंकण्यातही त्यांना यश आले होते.


Back to top button
Don`t copy text!