स्थैर्य, सातारा, दि. ०८ : सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच प्रशासनही चिंताक्रांत झाले आहे. येथील परिस्थिती हाताळण्यासाठी व त्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी सातारा जिल्ह्यात येत आहेत.
कराड येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री, दोन्ही जिल्ह्यांतील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, आयएमएचे अध्यक्ष यांच्यासमवेत बैठक करून तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. रविवारी सकाळी ११ वाजता कराडच्या वेणूताई चव्हाण सभागृहात ही बैठक होणार आहे.
सातारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्या चुकीच्या कारभारामुळे जिल्हा वेठीस धरला जात आहे. ते सातारा जिल्ह्यात आल्यापासूनच विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले असून त्यांच्याविषयी अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत. त्यामुळे या बैठकीत आरोग्यमंत्र्यांसमोर त्यांच्या कारभाराचा ‘पंचनामा’ होण्याची शक्यता आहे.