सातारा-पंढरपूर-दादर एक्स्प्रेस दररोज सोडा

प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे गरज; तिकीट कमी असल्यानेही प्रवासी आकर्षित


दैनिक स्थैर्य । 29 जून 2025 । सातारा । दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सातारा – पंढरपूर- दादर ही साप्ताहिक चालणारी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 11027/11028) सातारा येथून दररोज पंढरपूर-दादरसाठी सोडावी, अशी मागणी प्रवासी वर्ग, सातारा रेल्वे प्रवासी संघासह सातारा रेल्वे स्टेशन स्थानिक सल्लागार समितीच्या माजी सदस्यांनी केली आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक व मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, की 16 मार्च 2024 पासून सातारा येथून पंढरपूरसाठी सुरू झालेली सातारा-पंढरपूर- दादर एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सातारा जिल्ह्याच्या एकूण इतिहासात पहिल्यांदाच सुरू झाली आहे. ही गाडी सातारा येथून पंढरपूर आणि पुढे दादरला जात असल्याने सातारा रेल्वे स्टेशन टर्मिनल झाले आहे. या गाडीचा लाभ सातारा जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विठ्ठल रुक्मिणी भक्ती संप्रदायाच्या भाविकांना होत असून, अनेक भाविक या गाडीने पंढरपूर, पुढे सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राला जात आहेत. सातार्‍यातून पंढरपूरसाठी एक्स्प्रेस गाडी सुरू असल्याने वारकरी संप्रदाय आणि रेल्वे प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे. या गाडीचा फायदा सांगली, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होत असून, पुढे ही गाडी दादरला जात असल्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांनाही होत आहे. या रेल्वे गाडीला मुंबई दादरपासून ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील प्रवासी कमी तिकीट दर असल्यामुळे अधिक संख्येने प्रवास करतात.

ही एक्स्प्रेस सातारा येथून प्रत्येक सोमवार, मंगळवार, शनिवार दुपारी साडेतीन वाजता सुटून सातारा ते पंढरपूरपर्यंत 13 प्रमुख रेल्वे स्टेशनवर थांबून पंढरपूर येथे रात्री नऊ वाजता पोहोचते. पंढरपूरवरून पुढे मुंबई दादरसाठी रात्री 9:10 ला सुटून दादर येथे सकाळी 6:35 वाजता पोहोचते. दादर येथून प्रत्येक सोमवार, शुक्रवार, रविवारी रात्री 11:55 वाजता सुटून प्रमुख 14 स्टेशनवर थांबून पंढरपूर येथे सकाळी 8:10 वाजता पोहोचते. पंढरपूर येथून पुढे सातार्‍यासाठी सकाळी 8:15 वाजता सुटून सातारा येथे दुपारी 2:10 वाजता पोहोचते. या रेल्वे गाडीचा फायदा प्रवासी, विठ्ठल भक्त वारकर्‍यांना होत असून, गाडीला चांगला प्रतिसाद असल्याने सातारा पंढरपूर- दादर रेल्वे गाडी दररोज सातारा येथून पंढरपूर, दादरसाठी सोडल्यास प्रवासी, वारकर्‍यांना चांगला फायदा होईल.

रेल्वेचेही आर्थिक उत्पन्न वाढणार आहे, असे सातारा प्रवासी संघाचे अध्यक्ष विकास कदम, सातारा रेल्वे स्टेशन स्थानिक सल्लागार समितीचे माजी सदस्य किशोर शेंडे, मधुकर शेंबडे, हसमुख पटेल, राजेंद्र गलांडे, हेमंत जाधव, नितीन शिंदे, सुनील बर्गे, दत्तात्रय सुतार, योगेश मालाणी आदींनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!