
स्थैर्य, सातारा, दि. 7 ऑक्टोबर : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्गीय (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत बुधवार, दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शाहू कला मंदिर येथे पार पडणार आहे. या सोडत प्रक्रियेची घोषणा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली आहे.
सातारच्या प्रभागनिहाय आरक्षणाची अधिकृत यादी दि. 9 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष किंवा इच्छुक उमेदवार यांना आरक्षणासंदर्भात हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 9 ते 14 रोजीपर्यंत मुदत दिली आहे. संबंधित अर्ज कार्यालयात दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता असल्यास संबंधितांना स्वतंत्ररीत्या कळवले जाणार आहे. आरक्षणाची सोडत ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार आहे. सातार्यातील महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वामुळे या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या प्रभागात महिला उमेदवारांना संधी मिळणार याबाबत राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. इतर राजकीय पक्षांनी देखील प्रभागनिहाय संभाव्य उमेदवारांच्या शोधाला सुरुवात केली आहे.

