सातारा नगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी पाच कृत्रिम तलाव


स्थैर्य, सातारा  दि. 26 ऑगस्ट : श्री गणरायाच्या आगमनाला केवळ एक दिवस बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने गणरायाच्या स्वागतासह विसर्जन तळ्यांची व्यवस्था केली आहे. सातारा पालिकेने शब्द दिल्याप्रमाणे शहरांमध्ये पाच कृत्रिम तळ्यांची व्यवस्था केली आहे. ही तळी बुधवार नाका, गोडोली, दगडी शाळा याशिवाय राजवाडा येथील जलतरण तलाव व हुतात्मा स्मारकाजवळ बांधीव तलाव अशी सोय करण्यात आली आहे

सातारा शहर परिसरामध्ये नोंदणीकृत आणि नोंदणी नसणारी अशी 400 हन अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या गणेशोत्सव मंडळाचे गणपती दि. 5 व 6 सप्टेंबर रोजी विसर्जित होतील. विसर्जन मिरवणुकांचा ताण टाळण्यासाठी सातारा पालिकेने जास्तीत जास्त सोयी देण्याचे धोरण ठेवले आहे. याकरता दरवर्षीप्रमाणे मुख्य विसर्जन तळ्यावर 100 टन वजनी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याणी शाळेजवळील गोडोली तळ्यात मोठ्या मूर्ती विसर्जित केल्या जातील अशी सोय करण्यात आली आहे.

पाच विसर्जन तळ्यावर प्रत्येकी पाच याप्रमाणे 25 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावर मोती चौक ते बुधवार नाका यादरम्यान पोलिसांच्या सोयीसाठी सहा सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. आगमन सोहळ्यासह विसर्जन मिरवणुकीत वाजणारे डॉल्बी, दोन मंडळांच्या मिरवणुकीत पडणारे अंतर, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने होणारे वाद टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगी पडणार आहेत.

सातारा पालिकेने गणेशोत्सवाच्या विविध कामांसाठी तब्बल 54 लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यांत सर्व तळ्यातील गाळ काढून ती स्वच्छ करण्यात आली असून त्याकरिता पाण्याची सोय करण्यात आली आहे. बुधवार नाका परिसरातील विहीर तसेच कास येथील पॉवर हाऊस इतर जलस्रोताच्या माध्यमातून बुधवार नाका येथील तळ्यात 55 लाख लिटर पाण्याची सोय केली जाणार आहे.

तळ्यांमध्ये प्लॅस्टिक लाइनर टाकून त्यात पाणी भरण्याचे काम पुढील दोन दिवसांत सुरू होईल. विसर्जन स्थळावर पुरेसा वीजपुरवठा, सुरक्षिततेसाठी बॅरिकेटिंग, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक तळ्यावर दोन लाईफ गार्ड सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात केले जाणार आहेत


Back to top button
Don`t copy text!