स्थैर्य, सातारा, दि. 11 : नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी आणि तीन निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे त्यामुळे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची तातडीने बदली करुन त्यांच्या कार्यकालातील संपूर्ण कारभाराची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेल व्दारे निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात, सातारा पालिकेचा पदभार शंकर गोरे यांनी घेतल्यापासून त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. त्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यांच्या कारभारामुळे सातारा पालिका अनेकदा तोंडघशी पडली आहे. त्यांच्यावर तत्कालीन पालकमंत्री शिवतारे यांनी जिल्हाधिका-यांनी अनेकदा ताशेरे ओढले आहेत तरीही त्यांच्या कारभारात सुधारणा नाही. त्यांच्या कार्यकालात अनेक गैरव्यवहार झाले असून यापूर्वीही त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी झाल्या आहेत परंतु ठोस अशी कार्यवाही झालेली नाही. करोना महामारीच्या संकटकाळातही त्यांच्या कारभारातील दोष उघड झाले आहेत. अशातच पालिकेत प्रथमच अतिरिक्त मुख्याधिकारी आणि तीन आरोग्य निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या गौरवशाली इतिहासाला गालबोट लागले आहे. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करुन त्यांच्या कार्यकालातील संपूर्ण कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सुशांत मोरे यांनी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये विसंवाद असल्याचे अनेकदा समोर आले आहे त्याचा फटका सर्वसामान्य सातारकरांना बसत आहे. दोन्ही आघाडया आता एकमेकाकडे आणि प्रशासनाकडे बोट दाखवत असल्या तरी दोन्ही आघाडयातील काहीजणांचे हितसंबंध अनेक टेंडरमध्ये गुंतल्याचे समोर आले आहे. दोन्ही आघाडयांचे जो सापडला तो चोर नाही तर तेरी भी चुप मेरी भी चुप असे चालले आहे. त्यामुळे आता दोन्ही आघाडयांच्या नेत्यांनी विशेषतः खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी पालिकेतील पदाधिका-यांना कडक समज देऊन कारभारात तातडीने सुधारणा करण्यास सांगितले पाहिजे. नगरपालिकेतील भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. करोना महामारीच्या काळात आतातरी पालिकेतील प्रतिनिधी आपल्याला लोकांच्या सेवेसाठी निवडून दिले आहे याचे भान ठेवतील आणि अधिकारी समाजप्रती कर्तव्य पाडतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.