हरिद्वार, अजमेरसाठी साताऱ्यामार्गे कायमस्वरूपी एक्स्प्रेस


सातारा, कऱ्हाड आणि मिरजमार्गे धावणाऱ्या हुबळी-ऋषिकेश आणि म्हैसूर-अजमेर या दोन साप्ताहिक स्पेशल रेल्वेंना आता कायमस्वरूपी एक्स्प्रेसचा दर्जा मिळाला आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. २९ मार्च : दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातून चालणाऱ्या आणि साताऱ्यामार्गे जाणाऱ्या दोन साप्ताहिक स्पेशल रेल्वेंना आता कायमस्वरूपी एक्स्प्रेसचा दर्जा मिळाला आहे. यामुळे हरिद्वार, ऋषिकेश आणि अजमेरला जाणाऱ्या प्रवाशांची स्वस्त तिकीट दरात मोठी सोय होणार आहे.

कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश

गेल्या अनेक दिवसांपासून या रेल्वेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या या मागणीला रेल्वे बोर्डाने अखेर मान्यता दिली आहे. मध्य रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी याबाबतची माहिती दिली.

हुबळी-योगनगरी ऋषिकेश एक्स्प्रेस

“हुबळी-योगनगरी ऋषिकेश एक्स्प्रेस (१७३६३-१७३६४) आता कायमस्वरूपी धावणार आहे. ही रेल्वे प्रत्येक सोमवारी पहाटे ३.१० वाजता मिरज जंक्शनमधून निघेल. परतीच्या प्रवासासाठी शनिवारी रात्री १२.४५ वाजता ती मिरजेला पोहोचेल,” असे गोपाल तिवारी यांनी सांगितले.

या ट्रेनमुळे भाविकांना हरिद्वार, ऋषिकेश, आग्रा, मथुरा आणि दिल्ली यांसारख्या धार्मिक स्थळांना जाणे सोयीचे होणार आहे. या रेल्वेला मिरज जंक्शन, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड आणि इतर प्रमुख स्थानकांवर थांबा असणार आहे.

म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेसचे वेळापत्रक

म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस (१६२८१/१६२८२) ही ट्रेन शनिवारी पहाटे २.४५ वाजता मिरजेतून निघून सोमवारी पहाटे ४.३५ वाजता अजमेरला पोहोचेल. परतीसाठी सोमवारी सायंकाळी ६.५० वाजता अजमेरमधून सुटून बुधवारी पहाटे १.३५ वाजता मिरजेला येईल. या गाडीलाही मिरज जंक्शन, कऱ्हाड, सातारा, लोणंद आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!