दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । सातारा । अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हे वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम हे समाजातील प्रत्येक घटकाला जाणवत आहेत. पुढच्या पिढीला हे परिणाम जाणवू लागू नये म्हणून आत्तापासूनच पर्यावरण संवर्धनाचे काम करावे लागेल. भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशा दर्शक राहिल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात “ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग” जागतिक तापमानवाढीमुळे होणारे हवामानातील बदल, त्यांचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा आणि दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब, डिस्ट्रीक्ट 3234- डी 1 यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, कामधेनु विद्यापीठाचे कुलगुरु मदनगोपाल वार्षणेय, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, डॉ. अविनाश पोळ, डॉ. गुरुदास नुलकर, सिने अभिनेते आमिर खान (ऑनलाईन), सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे सुनिल सुतार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, लायन्स क्लबचे सदस्य, पर्यावरण प्रेमी ऑनलाईन उपस्थित होते.
आत्तापर्यंत माणुस हा निसर्गाशी संघर्ष करीत जगत आला आहे, असे सांगून श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनीही या आव्हानाला तोंडदेत पिक पद्धतीत बदल केला पाहिजे. वातावरणातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आपल्यापरीने काम करीत आहे. या कामात लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाईल. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग घेऊन यापुढे पर्यावरणासाठी काम करीत राहणार असल्याचेही श्री. नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.