स्थैर्य, सातारा, दि. ०४: कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या सातारा जिल्ह्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आपला सातारा या संकटातून निश्चित बाहेर पडणार आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाकडून चांगले काम सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण झालेलं होते. मात्र गेल्या तीन- चार दिवसांपासून रुग्णसंख्या घटत आहे. कडक लॉकडाऊन सुरु असल्याने प्रत्येकजण अडचणीत आहे. सर्व प्रकारचे छोटे, मोठे व्यावसायिक यांच्यासह सर्वसामान्य माणूस देखील अडचणीत सापडला आहे. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रत्येकाने थोडा धीर धरणे आवश्यक आहे. आपला सातारा कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमीसारखे सर्वानीच प्रशासनाला सहकार्य करावे.
सध्याची आकडेवारी पाहता कोरोनाच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी आता जास्त दिवस लागणार नाहीत. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा प्रशासनाचे काम नियोजनबद्धरीत्या सुरु असून कोरोनाचे संकट अंतिम टप्प्यात आहे. सोशल मीडियावर काही चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. यावर कोणीही विश्वास न ठेवता आपला जिल्हा कोरोनमुक्त करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनालासहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
|