मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सातारा जिल्ह्याचा डंका वाजणार

जिल्ह्यातील २९९ गावे निर्णायक टप्यावर


 स्थैर्य, 15 मार्च, सातारा : महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ग्रामविकास विभागाने सुरू केलेले ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ आता क्लायमॅक्सवर पोहोचले आहे. सातारा जिल्ह्यातील तब्बल २९९ ग्रामपंचायती सध्या ‘निर्णायक’ वळणावर असून, राज्याच्या स्पर्धेत जिल्ह्याचा झेंडा फडकवण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंबर कसली आहे. यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाते प्रमुखांची यासाठी कौतुकास्पद धडपड नक्कीच इतिहास घडविणार आहे.
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने ८ विषय आणि १०० गुणांकनांचा समावेश असून दि. ३१ मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.यामध्ये ग्रामपंचायतींना केवळ सरकारी योजना राबवून चालणार नाही, तर त्या अधिक गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने राबवाव्या लागणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर अग्रेसर ठेवण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. त्रुटी दूर करून जास्तीत जास्त गुणांकन मिळविण्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा भर आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील २९९ विशेष लक्षित ग्रामपंचायतींची कसून तपासणी करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांनी गावात जाऊन त्रुटी दूर करण्यावर भर दिला जात आहे.या अभियानाची मुदत दि. ३१ मार्च रोजी अंतिम असून आता सातारा जिल्ह्यातील विशेष लक्षीत २९९ गावांपैकी कोणती गावे करोडोंच्या बक्षीसांवर नाव कोरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!