स्थैर्य, सातारा, दि. २६ : राज्य शासनाने दि. 6 जुलै रोजी जाहीर केलेल्या मिशन बिगीन अगेन च्या पाचव्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सूरु करण्यास काही अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये या आदेशाद्वारे निवासी हॉटेल्स सुरू करण्यात आलेली आहेत, परंतु सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस गेले साडेपाच महिने बंद अवस्थेतच आहेत. सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असल्याकारणाने जिल्ह्यात हॉटेल्स, रिसॉर्ट्स, निवास न्याहरी योजनेतील कृषी पर्यटन केंद्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. या व्यावसायिकांचा आणि या व्यवसायावर अवलंबून असणार्या जिल्ह्यातील हजारो कामगारांच्या उत्पन्नाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मिशन बिगीन अगेन V, Order No. DMU-2020/C.R.92/DMU-1 दिनांक 6 जुलै 2020 नुसार सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची निवासी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याची मागणी सातारा जिल्हा टुरिझम असोसिएशन तर्फे श्री. चंद्रसेन जाधव व श्री. विनोद कुलकर्णी यांनी सातारा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा जिल्हा टुरिझम असोसिएशन ही संस्था पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नांबरोबरच सातारा जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी प्रयन्त करीत आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी व्यवसायात येणार्या अडीअडचणीं संदर्भात या संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.