स्थैर्य, सातारा, दि. 15 : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी करोना संसर्गाच्या काळात स्वत:च्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले असून सातारा शहर परिसरात त्या सायकलिंग करत आहेत. दरम्यान, आरोग्याबरोबरच सातारा शहरातील वाहतूक पाहता येते असेही त्यांनी सांगितले.
तेजस्वी सातपुते या सायंकाळी महामार्गालगत सेवारस्त्यावर सायकलिंग करत असल्याचे सातारकरांच्या निदर्शनास आले. त्या सायकलवर आपल्या शासकीय निवासस्थानापासून लिंब खिंडपर्यंत जावून परत आल्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी नुकतेच सायकलिंग सुरू केले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘सध्या कोरोना संसर्गाचा आव्हानात्मक काळ सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जिम, व्यायामाला बंदी होती. याचे पालन करावे लागल्याने व्यायामाकडे दुर्लक्ष झाले. आता व्यायामाला परवानगी मिळाली आहे.
आरोग्य तंदुरुस्त रहावे. करोनाशी लढता यावे तसेच सायकलिंगमुळे फिजिकल डिस्टन्सिंग उत्तमप्रकारे राखता येते,’ असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला. दरम्यान, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्यांनीही दिवसातून किमान एक तास स्वत:साठी वेळ काढून व्यायाम, सायकलिंग, योगासने करावीत. या निमित्ताने कामातील उत्साह वाढण्यास मदत होईल.