
सातारा जिल्ह्यातील कोयनासह प्रमुख सहा धरणांमध्ये सध्या ८४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे सिंचन आणि पिण्यासाठी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २९ मार्च : सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून जिल्ह्यातील प्रमुख सहा प्रकल्पांमध्ये सध्या ८४.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यात सर्वाधिक ६१.१६ टीएमसी पाणी एकट्या कोयना धरणात उपलब्ध आहे.
सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू
जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामासाठी धरणातील पाण्याचा वापर होतो. साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतीलाही या पाण्याचा फायदा होतो. सध्या उन्हाळा वाढत असल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी आणि तारळी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील महिन्यात या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत साठा
जिल्ह्यातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या सहा प्रमुख धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. सध्या या धरणांमध्ये ८४.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये ८५.३६ टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच, यंदा धरणांत सुमारे एक टीएमसी पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे.
धरणांमधून सध्या सोडले जाणारे पाणी
सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहासह एकूण ३ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय धोम धरणातून ५३९, कण्हेरमधून २००, उरमोडीतून ५५० आणि तारळी धरणातून १३४ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
धरणांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठा आणि टक्केवारी (टीएमसीमध्ये):
-
कोयना : ६१.१६ (५८.११%)
-
धोम : ६.८५ (५०.७४%)
-
कण्हेर : ६.३९ (६२.४९%)
-
उरमोडी : ६.२६ (६२.८५%)
-
बलकवडी : २.०५ (५०.२२%)
-
तारळी : १.९४ (३३.१७%)

